You are currently viewing ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात ‘क्वासार-२०२५’ आजपासून

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात ‘क्वासार-२०२५’ आजपासून

*‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात ‘क्वासार-२०२५’ आजपासून*

*दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत देशभरातील डिझाइन क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक व विद्यार्थी सहभागी होणार*

पुणे :

एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एमआयटी-आयडी) तर्फे विद्यापीठाची प्रमुख राष्ट्रीय डिझाइन परिषद ‘क्वासार २०२५ – Designing What’s Next’ ही ३० व ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

सर्जनशीलता आणि नवोपक्रमाचा उत्सव म्हणून साकारलेली ही दोन दिवसीय परिषद डिझाइनच्या भविष्यदृष्टीचा शोध घेणार असून तिचा प्रभाव उद्योग, तंत्रज्ञान आणि समाज या सर्व क्षेत्रांवर अधोरेखित करण्याचा उद्देश आहे. देशभरातील नामवंत डिझाइन तज्ज्ञ, उद्योगक्षेत्रातील व्यावसायिक, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी या परिषदेत सहभागी होणार असल्याची माहिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचे अधिष्ठाता डॉ. नचिकेत ठाकूर यांनी दिली.

डॉ. ठाकूर म्हणाले, “एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन ही देशातील अव्वल डिझाइन संस्थांपैकी एक असून, क्वासारच्या माध्यमातून पुढील दोन दिवस विद्यापीठात व्याख्याने, चर्चासत्रे, संशोधन पोस्टर सादरीकरणे, डिझाइन प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित दृश्य संवाद, सर्जनशील अनुभव, पॅकेजिंग डिझाइन, स्टॉप-मोशन अॅनिमेशन, ट्रान्सपोर्टेशन डिझाइन, UI/UX आणि मटेरियल इनोव्हेशन यांसारख्या विषयांवरील कार्यशाळाही आयोजित केल्या जाणार आहेत,” असे त्यांनी सांगितले.

*तरुणाईसाठी सर्जनशील व्यासपीठ*
कार्यक्रमाच्या सर्जनशीलतेला अधिक रंगतदार करण्यासाठी आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या असून त्यामध्ये, आलाप – गायन स्पर्धा, स्वरफ्युजन – वाद्य संगीत स्पर्धा, अभिव्यक्ती – एकपात्री अभिनय स्पर्धा, माइक ड्रॉप – स्टँडअप कॉमेडी स्पर्धा, नृत्यवर्स – समूह नृत्य स्पर्धा यांचा समावेश आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पकतेचा आणि कलागुणांचा आविष्कार दाखविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

*चौकट : डिझाइन क्षेत्रातील प्रभावी उपक्रम*
सहाय्यक प्राध्यापक डॉ. हर्षित देसाई यांनी सांगितले की, “या परिषदेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘डिझाइन रिसर्च पोस्टर स्पर्धेस’ देशभरातील ४० हून अधिक डिझाइन महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद प्राप्त झाला आहे. या दोन दिवसीय परिषदेतील ५०० हून अधिक प्रतिनिधींच्या सहभागामुळे ही परिषद देशातील डिझाइन क्षेत्रातील सर्वाधिक व्यापक आणि प्रभावी उपक्रम ठरणार आहे.”

*कोट : “क्वासार म्हणजे सर्जनशीलता, शिक्षण आणि नेतृत्व यांचा संगम”*
“संस्थेचे कार्याध्यक्ष तसेच प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘क्वासार’ ही परिषद सर्जनशीलता, शिक्षण आणि नेतृत्व यांचा संगम आहे.या परिषदेमुळे सहभागी विद्यार्थ्यांना वास्तव जगातील डिझाइन आव्हाने आणि संधींचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. तसेच त्यांना उद्योगक्षेत्रातील प्रतिभावान डिझाइन विचारवंतांशी संवाद साधण्याचे आणि नव्या सहकार्याच्या शक्यता शोधण्याचे व्यासपीठही उपलब्ध होते.”
*— डॉ. नचिकेत ठाकूर, अधिष्ठाता, एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन*
——————-
*फोटोओळ- पुणेः* पत्रकार परिषदेत माहिती देताना अधिष्ठाता डावीकडून डाॅ.हर्षित देसाई, डाॅ.नचिकेत ठाकूर व प्रा.चंद्रकांत बोरुडे.

प्रतिक्रिया व्यक्त करा