You are currently viewing मालवण- वायरीत कचरा गाडी चालकास मारहाण…

मालवण- वायरीत कचरा गाडी चालकास मारहाण…

मालवण- वायरीत कचरा गाडी चालकास मारहाण…

कामगारांचा उद्यापासून कामबंदचा इशारा ; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर…

मालवण,

येथील नगरपरिषदेच्या कचरा संकलन यंत्रणेत कार्यरत असलेल्या ४० कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी कचरा गाडीवरील चालकास मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या स्वच्छतेचे काम उद्यापासून पूर्णपणे बंद करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.

शहरातील वायरी भागात कार्यरत असलेल्या एका कचरा गाडी चालकास केवळ गाडी वळवण्यासारख्या किरकोळ कारणावरून गणेश चव्हाण नावाच्या व्यक्तीने केलेल्या मारहाणीमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे. या अत्यंत गंभीर घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांच्याकडे धाव घेतली असता त्यांनी अत्यंत बेजबाबदारपणे ‘या विषयात आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही थेट पोलीस ठाण्यात तक्रार द्या’ असे सांगून आपली जबाबदारी झटकली. यानंतर कर्मचारी पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी पालिकेचे अधिकृत पत्र आणण्याची अट घातल्याने प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या असंवेदनशील पत्रव्यवहारामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाल झाले.

मुख्याधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात ४० कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा हा थंड प्रतिसाद अत्यंत अपमानकारक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मारहाण करणारे गणेश चव्हाण यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात किंवा नगरपरिषदेत येऊन संबंधित चालकाची जाहीर माफी मागावी आणि भविष्यात असा प्रकार करणार नाही याचे लेखी आश्वासन द्यावे अशी मागणी केली आहे.

प्रशासकीय यंत्रणेकडून योग्य तो सन्मान आणि ठोस कारवाईची हमी न मिळाल्यास आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड न करता उद्यापासून मालवण शहराच्या स्वच्छतेचे संपूर्ण कामबंद आंदोलन छेडत आहोत. असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचरा समस्येची भीषण परिस्थिती आणि त्याची संपूर्ण जबाबदारी केवळ प्रशासन आणि मारहाण करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर राहील, असे त्यांनी सांगितले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी न्याय्य हक्कासाठी लढण्यास पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. हे निवेदन देण्यासाठी सुदेश आचरेकर आणि भाजपच्या शहराध्यक्ष अन्वेशा आचरेकर हे देखील उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा