*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम लेख*
*दिवाळीचा उपसंहार…*
बघता बघता दिवाळी आली आणि गेली. गेले पंधरा-वीस दिवस चालू असलेली बायकांची धावपळ थंडावली. दसरा झाला की दिवाळीची चाहूल लागते आणि कामांची, खरेदीची धूम सुरू होते!
मुलांची कपडा खरेदी आधी झाली की मग घरच्या गृहिणीची खरेदी होते. मग साडी, त्याचे मॅचिंग ब्लाऊज, ड्रेस शिवून घेणे या सर्वांमध्ये वेळ कसा जातो कळत नाही! शेवटचे चार-पाच दिवस फराळ बनवण्यासाठी ठेवलेले असतात. फराळाचे डबे भरून ओळीने लावले की गृहिणीला धन्य धन्य होते. अलीकडे तसाही बराच फराळ विकत मिळतो. तरीही दिवाळीची मजा वेगळीच असते! दिवाळीचे चार दिवस रोज नवीन व्यवधान! पहिला दिवस नरक चतुर्दशीचा, त्यानंतर लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज साजरी झाली की, दिवाळीचा उपसंहार चालू होतो! हे दिवाळीचे दिवस एकमेकांना फराळाचे देण्यात- घेण्यात, नवीन कपडे आहेर, देण्या -घेण्यात आनंदात पार पडत असतात.
या दिवाळीच्या उपसंहाराच्या काळात घरामध्ये वेगवेगळ्या चर्चा चालू असतात. कोणाचे फराळाचे पदार्थ कसे झाले होते, कोणी आपल्याला काय दिलं, पाडव्याची साडी किती
छान मिळाली..भावाने दिलेली
साडी छान आहे पण वहिनी ला त्याने अधिक चांगली साडी
घेतली…अशा रंगतदार चर्चा
चालू होतात! फराळाचे डबे हळूहळू रिकामे व्हायला
लागतात .दिवाळीच्या आधी चकचकीत घासलेले डबे आता
अगदी तेलकटलेले दिसू लागत. काहीं आवडते पदार्थ डब्यात राहतात तर चकलीचा डबा पहिल्यांदा खाली होतो. चिवडा मात्र भरपूर असे.. हे सर्व वर्षानुवर्ष असंच चालू असतं!
अशावेळी मला आमच्या काळातील दिवाळीचा उपसंहार आठवतो. आमच्याकडे माझी नणंद आणि भाचरं भाऊबिजेला येत असत.आणि पुढे ४/८ दिवस
रहात असत. सगळ्याच मुलांना सुट्टी असायची, त्यामुळे मग आमच्या एकत्र छोट्या-छोट्या ट्रिप निघत असत. कधी बागेत जायचं, तिथे जाऊन भेळ बनवायची! घरात राहिलेला शेव, चिवडा, फरसाण,चकलीचा चुरा असे सर्व पदार्थ घेऊन जायचं
आणि घरगुती भेळेला एखादी
विकतची भेळ घेऊन मिक्स करायची! असं साधेसुधे
काम असायचं! त्यात कुणालाही वेगळं वाटत नसे.
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेण्याची सवय होती. भाऊबीजेच्या जमलेल्या पैशातून काही उरलेली खरेदी होत असे. एखाद्या दिवशी फराळ आणि गोडाचा कंटाळा आला म्हणून खास कृष्णाकाठची वांगी आणून भरली वांगी, भाकरी, दाण्याची चटणी आणि दही असा बेत केला जाई. ते दिवस असे मजेत जायचे! हे चालू असतानाच बच्चे कंपनी दिवाळीचा शाळेचा अभ्यास करून घेत.
अलीकडे असा दिवाळीचा अभ्यास देण्याची पद्धत नाहीये बहुतेक! पण आमच्या मुलांपर्यंत तसं होतं .भरपूर गणिते, रोजचे शुद्धलेखन, शिवाय निबंध लेखन वगैरे दिलेलं असायचे.. रोज रोज कोण लिहिणार? त्यामुळे तारखा टाकून वेळ होईल तसे ते काम या काळात पूर्ण केले जायचे! हळूहळू सुट्टीचे दिवस संपत येत. मुलांना पुन्हा शाळा सुरू होणार याचे वेध लागत. तशीही शाळेत जायची उत्सुकता मुलांना असेच, कारण शाळेमध्ये मित्र-मैत्रिणी भेटतात, दिवाळीत काय काय केलं, किल्ला केला का,फिरायला गेलो, फराळ केला, खरेदी काय केली हे सर्व एकमेकांना दाखवायचे, ऐकवायचे असते! आई-वडीलही पुन्हा रूटीन सुरू होणार म्हणून थोडे उत्साहात असतात. दिवाळीचे चार- आठ दिवस हे वर्षभरासाठी आनंददायी असे
असतात.पूर्वी दिवाळीत पाहुणे येत असत.किंवा एखादे वर्षी घरची मंडळी आजोळी जाण्याचा प्लॅन करत.
एकदा दिवाळी संपली की नंतर मोठा सण असा नसतो. दिवाळीमध्ये सलग चार दिवस सणाचे, आनंदाचे असे असतात, त्यामुळे दिवाळी साजरी करायचीच असते. अलीकडे दिवाळीला थोडा शॉर्टकट करण्यात आला आहे.
लक्ष्मीपूजनापर्यंत घरी राहायचे आणि मग ट्रीपला जायचे असाही ट्रेंड आता दिसून येतो. आता स्त्रिया ही पुरुषांच्या बरोबरीने नोकरी, व्यवसायात गुंतलेल्या असतात. त्यांना स्वयंपाक घराचा ताण नको असतो. सुट्टीचे दिवस फिरायचे असते. त्यामुळे दिवाळीची मजा चार दिवस झाली की मग छोट्या-मोठ्या ट्रिप काढल्या जातात.
बायका दिवाळीची कामे सुरुवातीला उत्साहात करतात.
दिवाळी झाली की पुन्हा डबे
स्वच्छ करणे.घर जागच्या जागी लावणे चालू असते.
पणत्या, रांगोळ्या, आकाश कंदील सगळे आपापल्या जागी पुन्हा कपाटात बसतात.
फ्लॅट सिस्टिम मुळे आता घराला अंगण असते असे नाही, तरीही छोट्याशा जागेत छान रांगोळ्या काढून,त्यांत रंग भरून स्त्रिया आनंद घेत असतात.ती बाल्कनी ही स्वच्छ करावी लागते. .कपड्यांची ओतून वाहत असलेली कपाटे पुन्हा नीट लावावी लागतात. दिवाळीचा उपसंहारही असा ठरलेलाच असतो. पण काही झालं तरी दिवाळी ती दिवाळीच! दरवर्षी येते, तेव्हा आपण म्हणतोच, “दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा!”
उज्वला सहस्रबुध्दे, पुणे
