संपादकीय
*कै.गंगाराम गवाणकर…*
*मालवणी मातीतला कोहिनूर…*
ज्येष्ठ नाटककार कै.गंगाराम गवाणकर… केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशात वारी केलेल्या “वस्त्रहरण” या प्रसिद्ध, गाजलेल्या मालवणी नाटकाचे लेखक..! “नाना” या टोपण नावाने ओळखले जाणारे गंगाराम गवाणकर हे कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील माडबन या निसर्गसंपन्न गावचे रहिवासी. त्यांचे सातवी पर्यंतचे शिक्षण माडबन येथीलच शाळेत झाले. त्यानंतर शिकण्याच्या ओढीने ते विष्णू भाटकर यांच्या समवेत विना तिकीट बोटीने मुंबईला आले. मुंबईत स्वतःची जागा घेण्यासाठी किंवा भाड्याने राहण्यासाठी सुद्धा मोठ्या दिव्यातून जावे लागते याचा प्रत्यय नानांना सुद्धा आला. सुरुवातीला ते वडिलांच्या समवेत फुटपाथवर साडेचार वर्षे राहिले. स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीच्या आडोश्याला फुटपाथवर झोपडीत राहिले. अर्थात हे त्यांनी आपल्या “व्हाया वस्त्रहरण” या पुस्तकात लिहिलंय आणि अनेकदा विविध व्यासपीठावर देखील सांगितलं आहे. कबड्डी खेळताना मिळालेल्या बक्षिसाच्या १०/- रुपयात रात्र शाळेत नाव घालून पुढचे शिक्षण घेतले. सुरुवातीला सीए कडे २५/- रुपये पगाराची नोकरी केली. दहावीत असताना ज्या भाऊसाहेब म्हणजे वि. स. खांडेकरांची पुस्तके ते वाचत होते त्यांची अनायासे भेट झाली. त्यावेळी त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. पुढे त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला. नंतर त्यांनी मुंबई टेलिफोन्स मध्ये नोकरी केली..त्यांनी सामना, सकाळ, मुंबई चौफेर आदी वृत्तपत्रांतून स्तंभलेखन देखील केलं…परंतु वाचनाची प्रचंड आवड असलेले नाना रमले ते नाट्य लेखनात…
गंगाराम गवाणकर हे एक प्रसिद्ध मराठी आणि मालवणी नाटककार होते, जे त्यांच्या ‘वस्त्रहरण’ या नाटकासाठी ओळखले जातात. त्यांनी २० हून अधिक नाटके लिहिली, ज्यात ‘वन रूम किचन’, ‘दोघी’, ‘वात्रट मेले’ ‘ पोलिस तपास चालू आहे’, ‘ वडाची साल पिंपळाक’, ‘ मेलो डोळो मारून गेलो’, ‘ अरे बाप रे’, ‘ भोळा डांबिस’ आदी नाटकांचा समावेश आहे. “वस्त्रहरण” हे गंगाराम गवाणकर यांचे मालवणी भाषेत लिहिलेले नाटक आहे. वस्त्रहरण या नाटकाने गंगाराम गवाणकर हे नाव सात समुद्रापलीकडे नेले, यश, कीर्ती मिळवून दिली, एवढेच नव्हे तर मराठी रंगभूमीला मच्छिंद्र कांबळी नावाचा नटसम्राट मिळवून दिला. दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंगमहोत्सवात वस्त्रहरणचा प्रयोग झाला होता. या नाटकात महाभारताची टिंगल केली आहे असा आक्षेप घेऊन हे नाटक बंद पाडायचे प्रयत्न झाले होते. परंतु पु.ल. देशपांडे यांनी उचलून धरल्यामुळे हे नाटक चालू राहिले.
नानांनी “वनरूम किचन” (१००० वर प्रयोग), “वरपरीक्षा”, “वर भेटू नका”, “वस्त्रहरण” (मालवणी भाषेत, ५४००हून अधिक प्रयोग), “उषःकाल होता होता” (कुटुंबसंस्था आणि मुलांवर होणारे दूरगामी परिणाम) अशी सामाजिक परिवर्तन घडविणारी नाटके देखील लिहिली आहेत. त्यांनी १९९८ च्या ‘जागर’ या मराठी चित्रपटासाठी संवादही लिहिले. त्यांनी “ऐसपैस” (कादंबरी), “चित्रांगदा” (लेखसंग्रह, अनुवादित, मूळ लेखक – रवींद्रनाथ टागोर), “व्हाया वस्त्रहरण”(आत्मकथन) अशी पुस्तके देखील लिहिली आहेत.
गंगाराम गवाणकर यांनी लिहिलेल्या वस्त्रहरण नाटकानंतर मराठी रंगभूमीवर प्रादेशिक भाषेच्या विशेषतः मालवणी बोलीतील नाटकांचा उदय झाला. त्यांना ‘मानाचि संघटने’चा लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार, झी मराठी’ या दूरचित्रवाणी वाहिनीचा जीवनगौरव पुरस्कार मिळाले होते तर त्यांनी ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद देखील भूषविले होते. आपल्या कोकणातील व्यक्तीने संमेलनाचे अध्यक्षपद भूषवावे अशी मागणी नानांकडे केली असता वयाची ८५ वर्षे पार केलेले नाना आनंदात सावंतवाडी येथे येण्यास तयार झाले होते. सावंतवाडी येथे २२ मार्च २०२५ रोजी पार पडलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हा संमेलनाचे ते अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी वस्त्रहरण ते लंडनवारी वर भरभरून बोलले होते. लंडन प्रवासातील अनुभव सांगताना कित्येकदा ऐकणाऱ्या पोट धरून हसायला लावले. लेखक म्हणून ते उत्तम होतेच परंतु माणूस म्हणूनही ते नक्कीच श्रेष्ठ होते. सावंतवाडी येथील कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या दरम्यान त्यांनी आपण मुंबईतील स्मशानच्या शेजारी रस्त्यावर झोपडीत राहून आज इथपर्यंत पोहोचलो असे वास्तव सांगितले होते त्यावेळी त्यांच्यातील सच्चा माणसाचे दर्शन घडले होते. यशाचे पंख लागले की माणूस भूतकाळात अनवाणी चालल्याचे सुद्धा विसरून जातो परंतु वस्त्रहरणच्या निमित्ताने लंडनवारी करून मालवणी भाषेला सातासमुद्राच्या पार नेऊन स्वतः एक उंची गाठलेली असताना देखील आयुष्यात काट्यांनी भरलेले रस्ते पार केल्याचे ते विसरले नव्हते की यशाचं भूत त्यांनी मानगुटीवर बसू दिले होते.. ते शेवटपर्यंत साधेभोळे कोकणी माणूस म्हणूनच जगले. कोणीही भेटू देत, ओळखीचा असो की अनोळखी.. त्यांच्यासाठी तो आपला माणूस असायचा. अनोळखी व्यक्तीशी सुद्धा ते दिलखुलास गप्पा मारायचे.
आज गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड गेले पण त्यांचं नाव मात्र मालवणी मुलखातच नव्हे तर सिने नाट्य क्षेत्रात अजरामर राहील एवढे मात्र नक्की..!त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि नाट्यसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून येणार नाही.. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली…
✒️दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी, सिंधुदुर्ग
८४४६७४३१९६
