You are currently viewing पाव्सात शेती नको

पाव्सात शेती नको

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट:३७*

 

*पाव्सात शेती नको*

 

आज तिन्हीसांजे नंतर काकल्या घरी आला. खूप दमला होता. त्याच्या डोळ्यात झोप दिसत होती.

“काकल्या, खूप दमलेला दिसतोस?” मी विचारले.

“तुमी काय सुखी प्राणी. मिया शेतात वडी काडून इलय. न्हालय तो हडे इलय, जीवात तोल नाय रे. ” काकल्या म्हणाला.

” जेवतोस का?” मी आस्थेने विचारले. पण तो नको म्हणाला.

‘ वायच् कडकडीत चाय दि’ म्हणाला. मी चहा दिला, त्याला हुशारी वाटली.

“पावसान वाट लायली रे. यंदा बरा पिकलला, पून ह्यो पाव्स असो. घरात भात हाडूकच दियना. २० मेक चालू झालोहा. पाच म्हयने होवन् गेले. शेती सगळी चिखलात चल्लीहा. काय करूचा ता सांग. गावात आमी तिनच घराणी एकत्र रवलू. घरची माणसा हत, हून शेती करतो. माझ्या घरात अठ्ठावीस माणसा. आमी पिकवन् खातू रे. नुकसान भरपाईर जगणारे आम्ही न्हय. पून जर असाच चल्ला तर आमकाय शेती सोडुची लागतली.”

काकल्या कळवळून बोलत होता. खरं तेच बोलत होता.

निसर्ग बदलत चाललाय. माणसाची निसर्गाशी असलेली नाळ तुटय चाललीय. त्याला निसर्गाचं म्हणणं समजेनासं झालय.

“आमका फुकटचा नको. ह्या अवकाळ्यार उपाय काय तो सोदून काढा. नया तंत्रज्ञान हाडा. आमका मातीतला पिकवन् खावचा हा.” काकल्या बोलत राहिला.

“मग काय करायला हवं?” मी

” पावसातली शेती आता इसराक होयी. माका दिसता आता पावसात पाणी अडवन् थंडेतच शेती करूक होयी.” काकल्या वेगळच बोलला. खरंच आता वेगळ्या विचाराने पुढे जायला हवं. शेतीमध्ये खूपच संशोधन व्हायला हवं. जसं कमी पाऊस असलेल्या वाळवंटात शेती होऊ लागली आहे, तसं अती पावसावर मात करून शेती व्हायला हवी.

“पूर्वी थंडेत वायंगणी शेती करू मा आमी? त्येकाच आता जोर दिवक् होयो. त्येनी डबल फायदो होयत्. एक तर पीक हातात गावात आणि दुसरा म्हंजे टुर्लामेंटीक कुणगे मेळाच्ये नाय. पीढी बिघढयणारा ता पीकय थांबात. ” काकल्या निघून गेला.

 

*विनय सौदागर*

आजगाव, सावंतवाडी.

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा