वैभववाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक संपन्न;
सर्व जागा ताकदीने लढवण्याचा निर्धार
वैभववाडी
होऊ घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची वैभववाडी तालुका आढावा बैठक आज (दि. २८) शिवसेना कार्यालय, वैभववाडी येथे पार पडली. या बैठकीत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती जागांचा सखोल आढावा घेण्यात आला व सर्व जागा पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीच्या सुरुवातीला वैभववाडी तालुका सचिव गुलजार काझी यांनी युवसेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुका संपर्कप्रमुख विठ्ठल बंड, यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख दयानंद पेडणेकर, शिवसेना तालुकाप्रमुख नंदू शिंदे, तालुका सहसंपर्क प्रमुख प्रसाद नारकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर तसेच माजी तालुका संपर्कप्रमुख सुधाकर पेडणेकर व दीपक कदम यांचे शब्दसुमानाने स्वागत केले व आजच्या बैठकीचा अजेंडा सर्वांसमोर मांडला.
यावेळी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समितीच्या जागांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. कोळपे जिल्हापरिषद विभागप्रमुख जितू तळेकर यांनी कोळपे विभागाचा आढावा मांडताना सांगितले की, जिल्हा परिषदेसाठी ४ ते ५ उमेदवार इच्छुक असून, पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम सर्वजण प्रामाणिकपणे करतील. पंचायत समितीसाठी देखील उमेदवारांची लिस्ट तयार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकिसरे जिल्हापरिषद विभागाचा आढावा विभागप्रमुख यशवंत गवाणकर यांनी मांडला. कोकिसरे जिल्हापरिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या जागा शिवसेना अत्यंत ताकदीने लढणार असून या तिन्ही जागा जिंकण्यासाठी पक्ष प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. लोरे जिल्हापरिषद विभागप्रमुख सूर्यकांत परब यांनी या विभागातून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, इच्छुक उमेदवार विभागात मजबुतीने प्रचाराला लागल्याचे सांगितले.
यानंतर जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी मार्गदर्शन करताना, तालुक्यातील सर्व जागा योग्य नियोजन करून लढवाव्यात तसेच गावोगावी शाखाप्रमुखांशी संपर्क साधावा, अशा सूचना दिल्या. तालुका संपर्कप्रमुख विठ्ठल बंड यांनी, कार्यकर्त्यांच्या सर्व सूचना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवू व तालुक्यातील संघटना मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना प्रमुख सुशांत नाईक यांनी, संघटना बळकट करा व खेडोपाड्यात जाऊन ‘गाव तिथे शाखा’ उघडण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले.
शेवटी, तालुकाप्रमुख नंदू शिंदे यांनी वैभववाडी तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हा मजबुतीने उभा असून, सर्व जागा ताकदीने लढणार असल्याचे ठामपणे सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव गुलजार काझी यांनी केले व सभा संपल्याचे जाहीर केले.
या बैठकीस उपरोक्त पदाधिकाऱ्यांसोबतच अल्पसंख्याक तालुकाप्रमुख जाविद पाटणकर, महिला तालुका संघटक दिव्या पाचकुडे, नगरसेवक बंडू सावंत, उपविभागप्रमुख स्वप्नील रावराणे, माजी पं.स. सभापती लक्ष्मण रावराणे, ओंकार इसवलकर, एकनाथ गावडे, विलास मीर, सुरेश चाळके, दत्ताराम सावंत, सुरेश पांचाळ, जनार्दन विचारे, शंकर काकाटे, अर्चणा कोरगावकर, मंथन सुतार, संदेश सुतार, दिपक चव्हाण, वसंत मोरे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
