श्री चेस अकॅडमीचे अभिमानास्पद यश!
कणकवली :
सातारामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कणकवली येथील श्री चेस अकॅडमीच्या दोन खेळाडूंनी आपली छाप उमटवत राज्यस्तरावर झेप घेतली आहे.
सुश्रुत नानल यांनी अंडर-१७ ओपन गटात तिसरा क्रमांक मिळवला, तर मीनल सुलेभावी यांनी अंडर-१९ गर्ल्स गटात उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
या यशामुळे कणकवली आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मान उंचावला आहे.
या स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागातून निवड झालेल्या या दोन्ही खेळाडूंच्या मागे श्री चेस अकॅडमीचे समर्पित मार्गदर्शक व प्रशिक्षक श्रीकृष्ण अडेलकर सर यांचे कष्ट, बुद्धिबळातील बारकावे शिकवण्याची निष्ठा आणि प्रत्येक खेळाडूकडे दिलेले वैयक्तिक लक्ष आहे.
तसेच राजेंद्र तवटे सर यांनी या प्रवासाचे नियोजन, व्यवस्थापन आणि खेळाडूंना दिलेला आत्मविश्वास या यशात मोलाचा वाटा उचलला आहे.
या स्पर्धेत अकॅडमीतील एकूण १२ खेळाडूंनी सहभाग घेतला आणि सर्वांनीच उत्कृष्ट कामगिरी करत अकॅडमीचा झेंडा अभिमानाने फडकवला.
खेळाडूंना सतत प्रेरणा आणि मानसिक बळ देणारे श्रेयस तायशेटे सर (कणकवली), संदीप मिराशी सर (देवगड), प्रिया मुननकर मॅडम (कुडाळ), दिगंबर मोबारकर सर (वेंगुर्ला), तेंडुलकर सर (वेंगुर्ला) तसेच पालक प्रिया पारकर (कणकवली) यांचे योगदानही लक्षणीय ठरले.
या सर्वांच्या मार्गदर्शनाने, मेहनतीने आणि विश्वासाने आज सुश्रुत व मीनल यांनी हा मोठा टप्पा गाठला आहे.
आता हे दोन्ही खेळाडू १२, १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
श्री चेस अकॅडमी, कणकवली, प्रशिक्षकवर्ग, पालकवर्ग आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने या दोन्ही खेळाडूंना मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

