अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती देण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात सद्यस्थितीत भात व नाचणी पिकाची कापणी चालू असून 21 ऑक्टोंबर पासून अवकाळी पाऊस पडत आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 136 गावांमध्ये 1 हजार 18 शेतकऱ्यांचे 196 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल तालुका कृषि अधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयास कळविला असून तो शासनास सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार प्राथमिक नुकसानीमध्ये प्रामुख्याने भात व नाचणी या पिकांचा समावेश असल्याचे आढळून येत आहे. या अनुषंगाने अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी
संबंधित गावातील सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
नुकसानीबाबत माहिती प्राप्त झाल्यास संबंधित क्षेत्रिय अधिकारी शेतीची पाहणी करतील. अधिक माहितीसाठी ग्राममहसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधवा. शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती वेळेत द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

