You are currently viewing साळीस्ते खून प्रकरणाचा उलगडा

साळीस्ते खून प्रकरणाचा उलगडा

साळीस्ते खून प्रकरणाचा उलगडा

तिघे संशयित गजाआड – एलसीबी आणि कणकवली पोलिसांची संयुक्त कारवाई

कणकवली

मुंबई-गोवा महामार्गालगत साळीस्ते येथे सापडलेल्या श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बेंगलोर – कर्नाटक) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि कणकवली पोलिसांनी संयुक्त कारवाईत तब्बल तीन संशयितांना अटक केली आहे. ही धडक कारवाई सोमवारी रात्री बेंगलोर येथे पार पडली. संशयितांना घेऊन पोलिस पथक मंगळवार सायंकाळपर्यंत कणकवलीत दाखल होणार आहे.

या हत्याकांडाने आता हायप्रोफाईल वळण घेतले असून, आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चार दिवसांपूर्वी साळीस्ते येथे गणपती सान्याच्या पायरीवर श्रीनिवास रेड्डी यांचा मृतदेह आढळला होता. त्याच दिवशी रेड्डी यांच्या आईच्या नावे असलेली कार दोडामार्ग परिसरात रक्ताच्या डागांसह सापडली होती. दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले.

एलसीबी आणि कणकवली पोलिसांनी बेंगलोरमध्ये तीन दिवस गुप्त तपास केल्यानंतर संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीतून प्रॉपर्टी वादातूनच हा खून घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रेड्डी यांचा खून साळीस्ते परिसरातच करून आरोपींनी मृतदेह तेथे फेकला आणि कार दोडामार्गला टाकून पसार झाल्याचे समोर आले आहे.

एलसीबी अधिकारी आणि कणकवली पोलीस आता आरोपींकडून सखोल चौकशी सुरू करणार असून, पुढील काही तासांत खुनामागील खरे कारण आणि मुख्य सूत्रधार उघड होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणातील सिंधुदुर्ग पोलिसांची तत्परता आणि जाँबाज कामगिरी जिल्ह्यात कौतुकास पात्र ठरत असून, लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा