You are currently viewing देवगड एस.टी. स्टँडवरील बेवारस काळ्या बॅगेने खळबळ

देवगड एस.टी. स्टँडवरील बेवारस काळ्या बॅगेने खळबळ

देवगड एस.टी. स्टँडवरील बेवारस काळ्या बॅगेने खळबळ; पोलिसांचा तात्काळ हस्तक्षेप, फटाक्यांचा बॉक्स आढळला

देवगड –

आज (सोमवार) सायंकाळी सुमारे 4.43 वाजता देवगड एस.टी. स्टँड परिसरात काळ्या रंगाची एक बेवारस बॅग आढळल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने देवगड पोलीस ठाण्याला दूरध्वनीवरून दिली. तात्काळ या घटनेची गंभीर दखल घेत देवगड पोलिसांनी सिंधुदुर्ग नियंत्रण कक्षाला कळवून बीडीडीएस (Bomb Detection and Disposal Squad) तसेच श्वान पथकाची मदत मागवली.

थोड्याच वेळात बीडीडीएस पथक, श्वान पथक व एटीबी शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तपासणीदरम्यान त्या बॅगेत मोबाईलचे पीसीबी सर्किट आणि दिवाळीच्या फटाक्यांचे बॉक्स आढळून आले. प्राथमिक तपासात हे कृत्य कोणीतरी खोडसाळपणे, नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने केले असल्याचे समोर आले.

ही कारवाई सायंकाळी 5.45 ते 6.15 दरम्यान पार पडली असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. संपूर्ण मोहिमेत बीडीडीएस पथकाचे पोलीस निरीक्षक संजय साटम, हेड कॉन्स्टेबल पी. पी. दळवी, पी. एस. जाधव, कॉन्स्टेबल एन. बी. कुऱ्हाडे, जी. एफ. तळेकर, नाईक एस. व्ही. पाटील, एटीबी शाखेचे श्रीकांत जाधव, हवालदार मेहक परब तसेच देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ आणि त्यांचे सहकारी सहभागी झाले.

तपासाअंती ही घटना पोलिसांची सराव तालीम असल्याचे स्पष्ट झाल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.
या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही बेवारस वस्तू आढळल्यास तिला हात न लावता त्वरित देवगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा