*ज्येष्ठ कवी भूमिपुत्र वाघ लिखित वास्तववादी काव्यरचना*
*आकांत*
धग सरली
वादळ आलं
गारा आल्या
धारा आल्या
तो जणू कर्दनकाळ
कोसळत राहिला
बळीराजाच्या डोक्यावरती
थैमान घालत
नाचत राहिला
पुन्हा पुन्हा
महापुराचं थैमान
तांडव करत राहिला
दिवसेंदिवस….
शेती गेली
माती गेली
मती गेली
पिकं गेली
सपनांची
राख झाली
बळीराजा पोक्ता
कोलमडून गेला..
मग
घारी आल्या
गिधाडांची रेलचेल झाली
बगळ्यांचा सुळसुळाट झाला
बळीराजाची लक्तरे
वेशीवर टांगायला
मोकळा झाला…
टीव्ही आला
पेपर आला
पत्रकार आला
तेंव्हा राजाला जाग आली
तोवर राजा
उघड्या डोळ्यांनी
पाहत राहिला
पदाचा कचरा झाला
घमेंडीचा निचरा झाला
मग घोषणांची
आतषबाजी शरबती झाली
दीवाळी अशी आली
आणि
भरकन निघूनही गेली
बळीराजाच्या दुःखाची
वेशीतून धिंड निघाली…..
अजूनही
ते वाहून गेलेलं घर
लढतं आहे
आपल्याचं मातीबरं
लेकरा बाळांच्या दप्तरा बरं
मरून गेलेल्या
गाईवासरांच्या प्रेमाबरं
दुःखाचा उसळलेला डोंब
आणि आकांत
आभाळात केव्हाच विरून गेला….
तोच बळीराजा
थरथरत्या हाताची
मूठ बांधून
पिढ्यान पिढ्या
माणुसकीचे दान
झोळीत टाकण्यासाठी
माणूस नावाच्या जातीला
जतन करण्यासाठी
चिमण्या पाखरांच्या चाऱ्यासाठी
पेरता झाला
पेरता झाला………….
विद्रोही
भूमिपुत्र वाघ
9172972482
धाराशिव महाराष्ट्र.
