…..●बदलत्या भारतीय लोकशाहीचे स्वरूप..●
.
..●अटलवाणी..●अँड.नकुल पार्सॅकर..
लोकशाही,संविधान या विषयावर देशात अणि परदेशातही जोरदार दळण सुरू आहे.चर्चा,विचारमंथन या गोष्टी लोकशाहीला पुरक आहेत माञ दिवसेंदिवस सकारात्मक विचारा ऐवजी संविधानाला आणि लोकशाहीला धोक्यात आणणारी वक्तव्यं आणि कृती ही सगळ्याच राजकीय पक्षांकडून आणि नेत्यांकडून होत आहे,ही अतिशय दुर्दैवाची तेवढीचं चिंताजनक बाब आहे.
पारदर्शक व नि:पक्ष निवडणूका हा प्रबळ लोकशाहीचा पाया आहे,पण हा पायाचं आता ठिसूळ झालेला आहे.काँग्रेसच्या काळात निवडणूकात सत्तेचा दुरुपयोग करून अनेकदा विरोधी पक्षांची सरकारे पाडली.स्व.इंदिरा गांधींनी आणीबाणी आणून केलेली दमनशाही अवघ्या देशाने अनुभवली.आपापली प्रादेशिक अस्मिता राखण्यासाठी प्रादेशिक पक्ष निर्माण झाले आणि सत्ता राखण्यासाठी देशात आणि अनेक राज्यात आघाडीचे दळभद्री राजकारण सुरु झाले.महायुती किंवा महाआघाडी हा त्याचाच परिपाक आहे.
निवडणूक प्रक्रियाच बरबटलेली असल्याने निवडणूक आयोगच आज संशयाच्या फेऱ्यात अडकलेला असून बेछूट आरोप होत आहेत. सत्तेतून अमाप पैसा व पैशातून पुन्हा सत्ता हे द्रुष्टचक अधोरेखित होत आहे.याच पैशावर गुन्हेगारांच्या टोळ्या पोसल्या जात आहे.राजकीय पक्ष उमेदवारी देताना निवडून येण्याचे निकष म्हणजे अफाट पैसा,घाऊक मतदार विकत घेण्याची आर्थिक क्षमता आणि गुन्हेगारी यालाच प्राधान्य देत असल्यानेच भारताच्या संसदेत वा राज्यांच्या विधानसभेत अनेक गुन्हेगारी स्वरूपाचे लोकप्रतिनिधीं निवडून येतात.सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक राहीली नाही.सत्तेच्या जोरावर देशातील नैसर्गिक संसाधने उद्योगपतींच्या घश्यात घालून निसर्ग ओरबडण्याचे काम सुरु असून मायनिंग माफिया,भूमाफियांचे थैमान सुरू आहे.सामान्य माणूस पिचलेला आहे.मध्यम वर्गीय अगतिक आहे.बुद्धिजीवी चर्चा करत आहे.निवडणूकीत विशेष यंञणा लावून मतदार विकत घेतले जात आहे.सत्ता टिकवण्यासाठी आमदार,खासदारांची खरेदी विक्री खुलेआम सुरु आहे.
निवडणूक प्रक्रियेचे शुद्धीकरण करण्यासाठी आपले संविधानाने दिलेले अधिकार व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारे शेषन यांच्या सारखे निवडणूक आयोग आता दुर्बिणीतून शोधावे लागतील.एका मताने सरकार पडले तरी चालेल पण भ्रष्ट मार्गाने टिकवलेल्या सत्तेला चिमट्याने पण शिवणार नाही असे ठणकावून सांगून तसे आचरण करणारे आदरणीय अटलजी शोधावे लागतील.
आजच्या बदलत्या भारतीय लोकशाहीचे स्वरूप खरोखरच चिंताजनक आहे हे वास्तव मान्य करावेच लागेल.निवडणूका जिंकण्याचा मंञ आणि तंत्र पूर्णपणे बदलेल आहे.काॅग्रेसने पूर्वी मतदारानां कंदिलाच्या उजेडात पैसे वाटले आता डिजीटल उजेडात खुलेआम पैसे वाटून मतदार विकत घेतले जात आहेत.
