ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता मोहीम
मालवण
मालवण पंचायत समितीने स्वच्छता पंधरावडा अभियानाची घोषणा केली असून या द्वारे ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. लवकरच या मोहिमेचा शुभारंभ केला जाईल, अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव व उपसभापती राजू परुळेकर यांनी दिली.
मालवण पंचायत समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांनी या उपक्रमास पाठींबा दर्शवत अभियानाचे स्वागत केले आहे. या मोहिमेत मालवणचा प्रमुख ऐतिहासिक ठेवा असलेल्या किल्ले सिंधुदुर्गसह, मसुरे भरतगड, चिंदर भगवंतगड, ओवळीये सिद्धगड तसेच कुडोपी माळरानावर असलेला कातळशिल्प ठेवा आणि मालवण तालुक्यातील अन्य ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. ऐतिहासिक ठेवा स्वच्छ-सुंदर राहावा. पर्यटक, इतिहासप्रेमी यांच्यापर्यंत तो योग्य पद्धतीने पोहचावा. हाच यामागील उद्देश असल्याची भावना सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांनी व्यक्त करून लवकरच अभियानाची तारीख निश्चित करून सर्वांच्या सहभागातून ऐतिहासिक स्थळांच्या स्वच्छता अभियानाची सुरुवात होईल, असे म्हटले आहे.