You are currently viewing दीपोत्सव आनंदाचा

दीपोत्सव आनंदाचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

 *’ दीपोत्सव आनंदाचा ‘*

 

दिवाळीतले दीप उजळले तेज पसरले दारी

आनंदाची पणती उजळू भाग्योदय करणारी ||ध्रु||

 

सण वर्षाचा सण तेजाचा हसत दिवाळी आली

घराघरातुन रंगबिरंगी छान सजावट झाली

दारापुढती रेखियली मी रांगोळी बघ न्यारी

आनंदाची पणती उजळू भाग्योदय करणारी ||

 

दीप तेवते पहा मांडले विविध प्रकारे खुलती

तेजाची हो अखंड उधळण तारकादले दिसती

महात्म्य आहे हेच सणाचे चैतन्य मिळे भारी

आनंदाची पणती उजळू भाग्योदय करणारी ||

 

नरकासुरवध लक्ष्मीपूजन पाडवा हा शुभंकर

सण संमेलन खासियत असे दीपावलीत सुंदर

आनंदाला उधाण येई नाती सुखावणारी

आनंदाची पणती उजळू भाग्योदय करणारी ||

 

परदारी पण उजेड येवो कृती करावी सात्विक

आनंदाचे वाटप करणे सौख्य होतसे आत्मिक

दिवा दिव्याने पेटत जातो एकत्व शुभंकारी

आनंदाची पणती उजळू भाग्योदय करणारी ||

 

*ज्योत्स्ना तानवडे. पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा