You are currently viewing कुणकेश्वर ग्रामपंचायतीचा हरित दिवाळी उपक्रम

कुणकेश्वर ग्रामपंचायतीचा हरित दिवाळी उपक्रम

माझी वसुंधरा अभियानांतर्गत कुणकेश्वरमध्ये आकाशकंदील व रांगोळी स्पर्धा; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

देवगड :

देवभूमी कुणकेश्वर येथे ग्रामपंचायतीतर्फे यंदाची दिवाळी हरित आणि पर्यावरणपूरक साजरी करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत. “माझी वसुंधरा अभियान ६.०” आणि “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत ग्रामपंचायत कुणकेश्वरने गावकऱ्यांसाठी दोन सृजनशील स्पर्धांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांचा उद्देश गावकऱ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सण साजरा करताना निसर्गाशी मैत्री वाढवणे हा आहे, अशी माहिती सरपंच महेश ताम्हणकर यांनी दिली.

पहिली स्पर्धा म्हणजे “पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा”. या स्पर्धेत स्पर्धकांनी स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून कंदील तयार करायचे आहेत. ही स्पर्धा २० ते २७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पार पडणार असून, स्पर्धकांनी आपले कंदील ग्रामपंचायतीच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर फोटो स्वरूपात पाठवायचे आहेत. विजेते स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येतील. लक्षात घ्यावे की बाजारातून विकत घेतलेले कंदील या स्पर्धेस ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

दुसरी स्पर्धा म्हणजे “पर्यावरणपूरक रांगोळी स्पर्धा”, ही २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ३ ते ६ या वेळेत कुणकेश्वर देवस्थान भक्त निवास हॉल येथे होणार आहे. या स्पर्धेत ‘पाणी व वीज बचत’, ‘अपारंपरिक ऊर्जा वापर’, ‘प्लास्टिक बंदी’ आणि ‘फटाक्यांवरील बंदी’ या चार विषयांवर रांगोळ्या काढायच्या आहेत. उत्कृष्ट रांगोळी सादर करणाऱ्या स्पर्धकांना पहिल्या तीन क्रमांकानुसार भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.

पर्यावरण प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी, स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गावाला हरित बनविण्यासाठी हे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास सरपंच महेश ताम्हणकर यांनी व्यक्त केला.

“या वर्षीची दिवाळी फटाक्यांच्या आवाजात नव्हे तर पर्यावरणपूरक उपक्रमांनी साजरी करूया आणि आपला कुणकेश्वर गाव हरित, स्वच्छ आणि समृद्ध बनवूया,” असे आवाहन त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा