सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. शंतनू तेंडुलकर यांची फिजिशियन म्हणून नियुक्ती
सावंतवाडी
येथील उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियन पदाची रिक्तता अखेर भरली असून, डॉ. शंतनू तेंडुलकर यांनी या पदाचा तात्पुरता कार्यभार स्वीकारला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या आदेशानुसार त्यांना नेमणूक पत्र देण्यात आले.
या नियुक्तीसाठी वकील अनिल निरवडेकर यांनी पुढाकार घेतला, तसेच भाजप युवा नेते विशाल परब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून ही नियुक्ती शक्य झाली. त्यामुळे सावंतवाडी आणि आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना आता स्थानिक पातळीवरच उपचार मिळणार असून, गोवा-बांबुळीसारख्या दूरच्या रुग्णालयांवरचा अवलंबित्व कमी होणार आहे.
यापुढे आणखी तीन नर्सेसची नेमणूक लोकसहभागातून करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही श्री. परब आणि श्री. निरवडेकर यांनी सांगितले. डॉ. तेंडुलकर यांच्या नियुक्तीमुळे आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना त्वरित वैद्यकीय सेवा मिळेल, असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
