*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
!! दिवाळी !!
दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्त्व दिले आहे. दिवाळी या शब्दांचा अर्थ
” रोषणाईचा सण ” किंवा ” दिपोत्सव”
असा आहे. संस्कृत मध्ये दिवाळी शब्दास ” दिपावली ” असा अर्थ मानला जातो. याचा अर्थ ” दिव्यांची रांग ” असा केला जातो. हा दिपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी अश्विन व कार्तिक या महिन्याच्या संधिकालात हा सण येतो.
अश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान येत असतो.
उपलब्ध पुराव्यानुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव उत्तर ध्रुव प्रदेशात होते त्या काळात झाला असा समज आहे. वैदिक काळात अश्विन महिन्यात शरद ॠतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असतं ज्यांचा समावेश सात पाकयज्ञ यामध्ये होतो. परंतू या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात असे नेमके म्हणता येते असे नाही.
काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षाचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह आयोध्येला परत आले ते याच दिवसात. पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्या पेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा.
दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे. तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही हेच नाव नोंदवलेले आहे. ” नीलमत पुराणया ” ग्रंथात या सणाला “दीपमाला” असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला ” दीपप्रतिपदुत्सव” असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात ” दिवाळी ” हा शब्द वापरला आहे. “व्रतप्रकाश” नावाच्या ग्रंथात
” सुखसुप्तिका ” म्हणून दिवाळीचा उल्लेख आहे तर भविष्योत्तर पुराणात दिवाळीला ” दिपालीका ” म्हटले आहे
” पूर्व दिशेच्या राऊळी उदयताची सूर्य दिवाळी ” अशा शब्दांत ज्ञानेश्वरांनी सूर्य देवाच्या रूपकातून दीपकाचा गौरव केला आहे. ” दिवा ” हा अग्नीचं
तेजाचचं रूप… मिणमिणणा-या पणती पासून ते झळाळत्या आकाशकंदिलापर्यंत, समईच्या स्निग्ध ज्योतीपासून ते भुईनळ्यापर्यंत आणि आंघोळीच्या मध्ये केलेल्या औक्षणातल्या निरांजनापासून ते सप्तरंगांची बरसात करणा-या बाणापर्यंत सर्वत्र भरून राहिलेलं आहे
ते म्हणजे फक्त तेज आणि तेजचं..
चार पाच दिवस चालणारा हा उत्सव फारच आनंददायी नवचैतन्य निर्माण करणारा असतो.दिवाळीला प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व आहे. अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य ( धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी..या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करून दिवाळीस प्रारंभ होतो. लक्ष्मीपूजनाचा महत्वाचा दिवस धनरूपी लक्ष्मीचे पूजन केले जाते. बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा नुतनवर्ष प्रारंभदिन आणि भाऊ- बहिणीच्या नात्याची वीण घट्ट करणारा भाऊबीज हा दिवस..अशी मुख्य चार दिवस असणारी ही दिवाळी…
दिवाळी हा रोषणाईचा सण लखलखत्या दिव्यांनी वातावरणातल्या अंधःकाराचं साम्राज्य दूर सारण्याचा, आयुष्य तेजोमय, प्रकाशमय आणि दिव्यांच्या ज्योतीसमान पवित्र करण्याचा सण म्हणजेच दिपावली..आपले घर, गाव, शहर लख्ख प्रकाशाने उजळून निघते. हा प्रकाशच सर्वत्र चैतन्य निर्माण करतो.. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दिपोत्सव साजरा केला जातो. या दिवसात सायंकाळी दारात रांगोळी काढून पणत्या लावतात.घरांच्या दारावर आकाशकंदिले लावली जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात व त्यावर मातीची खेळणी मांडतात धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद नाही.
आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक क्वचितच एकमेकांना भेटतात. त्यावेळी दिवाळीचा सण आपल्या प्रिय व्यक्तींना भेटण्याच्या आनंदमयी संधी घेऊन येते. पुढिल वर्षंभर जगण्याची प्रेरणाही देते..
आजच्या काळात सर्व देशवासी पर्यावरणाला होत असलेल्या नुकसानाबाबत जागृत आहेत. त्यामुळे बरेच जण प्रदुषणविरहित दिवाळी साजरी करतात. दिवाळीत हानिकारक फटाके फोडले जात नाहीत .शाळा आणि इतर संस्थांमध्ये तसेच भारत सरकारही नागरिकांना प्रदूषणयुक्त दिवाळी साजरी करण्याची विनंती करतात.
दिव्यांची रोषणाई म्हणजे फक्त दिवे लावून अंगण उजळणं एवढंच नाही तर या दिव्यांनी मनाचा गाभारा भरला पाहिजे,उजळला पाहिजे. आज माणसांच मन अंधारात चाचपडतयं त्याला स्वतःचा उजेड मिळेनासा झालाय त्यासाठी त्यानं स्वतःच स्वतःचा दिवा लावायला पाहिजे. दिव्यांचं प्रतीक असलेली ही इवलीशी पणती समाजाच्या प्रत्येक घटकाला आपलसं करून समसमान प्रकाश देते अगदी तसच्चं…
या सणामागचा उदात्त हेतू असा की कृतज्ञतापूर्वक माणुसकी जोपासून परोपकार करावा व सर्वांना आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावं.विश्वाचं पालन करणा-या महाशक्तीला विसरू नये.
भारतात सर्व धर्मीय लोक दिवाळी मोठ्या आनंदात साजरा करतात. दिवाळी रोषणाई,उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला,मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्त्वही लोक आजही जाणतात..
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी ©
9870451020
