रमा एकादशीनिमित्त श्री राधाकृष्ण मंदिरात भक्तिभावाने आरती, हरिपाठ आणि प्रसाद वितरण
कुडाळ –
आज रमा एकादशीनिमित्त श्री राधाकृष्ण मंदिरात सकाळी काकड आरतीने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. जवळपास एक तास झालेल्या आरतीनंतर हरिपाठ पार पडला. त्यानंतर मंदिरातील सर्व देवतांच्या आरत्या करण्यात आल्या.
या विशेष दिवशी अजित नाडकर्णी यांनी शेंगदाण्याची उसळ प्रसादासाठी अर्पण केली. मंदिराचे पुजारी मसुरकर यांनी ही उसळ श्री राधाकृष्णांच्या चरणी अर्पण करून नंतर भाविकांना प्रसाद म्हणून वितरित केली. उपस्थित सर्वांनी प्रसादाचा आनंद घेतला.
एकादशीचा उपवासाचा दिवस लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कार्यक्रमात सचिन टायशेटे आणि बंटी मालवडे यांनी संपूर्ण स्वयंपाकाच्या कामात मोलाची साथ दिली. त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
श्री राधाकृष्ण मंदिरात दररोज कोणी ना कोणी भक्त श्रद्धेने प्रसाद अर्पण करत असतो, हे या परंपरेचे एक सुंदर उदाहरण ठरले. एकादशीच्या निमित्ताने आजचा दिवस भक्तिमय आणि सेवाभावी वातावरणात पार पडला.
