You are currently viewing सुपर कम्प्युटरचे जनक महाराष्ट्र भूषण डॉ.विजय भटकर

सुपर कम्प्युटरचे जनक महाराष्ट्र भूषण डॉ.विजय भटकर

11 ऑक्टोबर 79 व्या वाढदिवसानिमित्त

 

सुपर कम्प्युटरचे जनक महाराष्ट्र भूषण डॉ.विजय भटकर

 

पुण्याच्या सुप्रसिद्ध अशा एमआयटीचे चेअरमन डॉ. विश्वनाथ कराड यांना तहान लागली होती .ते विजय भटकर साहेबांना म्हणाले साहेब मला पाणी पाहिजे होते. डॉ. विजय भटकर भटकर आतमध्ये गेले. आणि पाण्याचा ग्लास घेऊन त्यांनी तो कराडसाहेबांच्या हाती सोपवला. आम्ही सर्वजण पाहतच राहिलो. कराडसाहेब म्हणाले भटकर साहेब आपण कोणाला तरी सांगायला पाहिजे होते. आपणच पाणी घेऊन आलात.

 

डॉ.विजय भटकर म्हणाले मी तुमच्याबरोबरच माझ्या गावाला मुरंबा येथे आलो आहे. सर्वजण कार्यक्रमाच्या तयारीत आहेत. याला त्याला बोलावल्यापेक्षा मीच पाणी आणलेलं काय वाईट आहे.

 

किती ही विनयशीलता. या घटनेचा मी साक्षीदार आहे. भटकर साहेबांनी त्यांच्या गावला म्हणजे अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्याची मुरांबा या गावला कार्यक्रम ठेवला होता. जाताना ते अमरावती वरून गेले. आम्ही देखील त्यांच्याबरोबर मुरंबा गाठले. भटकरसाहेबांचे घर साधेच होते. आम्ही त्यांच्या ओसरीत बसलो. त्यामध्ये सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डा. रघुनाथ माशेलकर योगतज्ञ पाळेकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री पाटील तसेच विश्वनाथ कराड व मी आम्ही कसेबसे त्या पडवीत बसलो. तेव्हाचा हा प्रसंग.

 

भटकरसाहेब यांचे मुरंबा गाव ते मुर्तीजापुर हे साधारणतः दहा-बारा किलोमीटर अंतर आहे .शालेय शिक्षण घेत असताना विजय भटकर दररोज हे अंतर पायी कापत होते. घरी सायकल पण नव्हती आणि आज विजय भटकर यांना नेण्यासाठी चार्टर्ड प्लेन येतात हेलिकॉप्टर येतात. पण हा माणूस जमिनीवर होता आहे आणि राहिलही.

 

आपल्या मुरंबा गावाकडे त्यांचे पूर्ण लक्ष आहे. खरं म्हणजे हे गाव मेन रोडवर नाही. आड वळणाला आहे .पण

 

घार हिंडते आकाशी

लक्ष तिचे पिलापाशी

 

या नात्याने विजय भटकर सतत आपल्या गावच्या संपर्कात असतात. गावाला आले की त्यांचा तीन-चार दिवस मुक्काम असतो. अमरावतीला जरी कार्यक्रम असला तरी ते विश्राम भवनात न थांबता आपल्या गावात थांबतात. गावासाठी काय काय करता येईल ते सगळे ते करतात. खूप वर्षांपूर्वी त्यांनी गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून गावात बिसलरीचा प्लॅन्ट टाकला. फक्त पाच रुपयांमध्ये 30 लिटर पाणी लोकांना मिळायला लागले. बरेच लोक मोठे झाले म्हणजे गावाला विसरतात. पण भटकरसाहेब तर खूपच मोठे झाले. पण आपल्या गावाला विसरले नाहीत .हा त्यांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने लक्षात घेण्यासारखा आहे .

 

राजीव गांधी जेव्हा भारताचे पंतप्रधान होते तेव्हा डॉ. विजय भटकर यांनी सुपर कम्प्युटर बनविला. या सुपर कम्प्युटरची जगात नोंद झाली. एका साध्या खेड्यात राहणारा मुलगा किती उंच भरारी घेऊ शकतो हे भटकर साहेबांनी आपल्या स्वतःच्या उदाहरणा तून लोकांना दाखवून दिले.

 

भटकर साहेबांच्या माझा परिचय खूप जुना आहे. त्यालाही वीस वर्षे झाली असतील. मला भटकर साहेबांवर पुस्तक लिहायचे होते . मी श्री दिनेश भटकर यांना सांगितले. ते म्हणाले. तुम्ही काकांशी बोला.मी त्यांच्या सतत संपर्कात होतो. ते म्हणाले काठोळे आपण निवांत कुठेतरी दोन-तीन दिवस जाऊ आणि पुस्तकाचे लेखन करू. पण भटकर साहेब इतके व्यस्त होते की तो योग काही जुळून आला नाही.

 

एक वेळ पुण्याला असताना मी डॉ. विजय भटकर यांना भेटायला निघालो .तेव्हा पाषाण रोडला भंडारी शो रुमजवळ त्यांचे कार्यालय होते. माझ्याबरोबर माझे मित्र श्री उत्तम मुरादे यांचा मुलगा चंद्रशेखर मुरादे हा होता. आम्ही भटकरसाहेबांकडे पोहोचलो .भेट झाली .चर्चा झाली .चहापाणी झाले.साहेबांनी चंद्रशेखरची चौकशी केली .चंद्रशेखर तेव्हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमध्ये बीएससी करीत होता .भटकरसाहेब त्याला म्हणाले. तू एम एस सी ला अप्लाईड फिजिक्स घे. आम्ही बाहेर आलो. चंद्रशेखर मला म्हणाला. काका अप्लाईड फिजिक्सला तर सध्या काही डिमांड नाही .पण ज्याअर्थी भटकर साहेब सांगत आहेत त्याअर्थी भविष्यात या विषयाला नक्कीच मागणी असणार आहे. त्याने त्याप्रमाणे एम एस सी केले. आज चंद्रशेखर जागतिक कीर्तीचा संशोधक म्हणून अबुधाबी येथे काम करीत आहे. भटकरसाहेबांची जर भेट झाली नसती तर कदाचित आज त्याला जे मोठेपण मिळाले आहे ते कदाचित मिळाले नसते .

 

मी मुरंब्याला साहेबांच्या आजूबाजूलाच असतो. ते यासाठी की त्यांच्यावर लेखन करण्यासाठी मला काहीतरी मुद्दे मिळत असतात. मला आठवते एक वेळ आम्ही मुरंबा येथे गेलो. भटकरसाहेब आलेले होते . नुकताच पाऊस येऊन गेला होता. पॅन्ट खालून भिजू नये म्हणून त्यांनी पॅन्टला खालून तीन फोल्ड पॅन्टला मारल्या होत्या. हातात प्लेट घेऊन ते जेवत होते .तेवढ्यात काही विद्यार्थी त्यांना भेटायला आले. विद्यार्थी म्हणाले सर तुमचे जेवण झाल्यानंतर आम्ही तुमच्याशी बोलतो. भटकर साहेब म्हणाले मी जेवण करीत असतानाच बोला. कारण अजून बरेच लोक भेटायला आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला पुरेसा वेळ मिळणार नाही आणि जेवण करीत असतानाच त्यांनी त्या विद्यार्थ्यांचे समाधान केले. त्यांच्या जागी जर कोणी दुसरा असता तर त्याने म्हटले असते अरे तुम्हाला दिसत नाही काय ? मी जेवण करीत आहे म्हणून .जेवण झाल्यानंतर भेटा.

 

भटकरसाहेबांनी जो मंत्र दिलेला आहे तो म्हणजे गावाकडे चला. आपण आपले गाव समृद्ध केले तर भारत देश समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही .ही त्यांची विचारसरणी आहे आणि म्हणूनच ते वारंवार आपल्या मुरंबा या गावाला येतात .गावासाठी जे जे चांगले करता येईल ते ते करतात. सर्वांशी बोलतात .सर्वांबरोबर फोटो काढतात .त्यांचा चेहरा सतत हसतमुख असतो .

 

आमचे दर्यापूरचे मित्र प्रा गजानन भारसाकळे हे दरवर्षी त्यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करतात. याही वर्षी त्यांनी अकोल्याच्या श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये त्याचे नियोजन केले आहे. आमच्या दर्यापूरच्या आई महोत्सवामध्ये देखील भटकरसाहेब आले होते .आम्ही त्यांची बैलबंडी मधून मिरवणूक काढली होती. ते म्हणाले माझ्या खूप मिरवणुका निघाल्या .पण बंडी मध्ये निघालेली ही पहिली आणि शेवटची मिरवणूक. आमच्या दर्यापूरच्या आई महोत्सवाची त्यांनी खूप तारीफ केली आणि मदतही केली.

 

मागच्या वेळेस मुरंबा येथे त्यांनी माझा सत्कार केला. ते म्हणाले काठोळे तुम्ही खूप काम करता .तुमच्यासारख्याचा सन्मान झाला पाहिजे. एवढ्या मोठ्या माणसाने माझ्यासारख्या माणसाची दखल घ्यावी म्हणजे फार मोठी गोष्ट झाली .ती दूरदृष्टी त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणूनच त्यांच्या संपर्कात आलेला कोणताही माणूस त्यांना विसरू शकत नाही. आज त्यांचा 79 वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा

 

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक.

मिशन आयएएस.

अमरावती कॅम्प.

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा