You are currently viewing वैभववाडीतील सहा नगरसेवकांचा भाजपला रामराम ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती बांधले शिवबंधन 

वैभववाडीतील सहा नगरसेवकांचा भाजपला रामराम ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती बांधले शिवबंधन 

भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या “त्या” सातपैकी सहा नगरसेवकांनी मुंबई येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल सायंकाळी शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष आणि विदयमान नगरसेवक रविंद्र रावराणे, संजय चव्हाण, दीपा गजोबार, संतोष पवार, रविंद्र तांबे, स्वप्निल इस्वलकर तसेच वैभववाडी बुथप्रमुख संतोष निकम, दीपक गजोबार यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या सात नगरसेवकांनी यामध्ये तीन नगराध्यक्ष म्हणून पद भूषविलेल्या नगरसेवकांनी सोमवारी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर वैभववाडीत एकच खळबळ उडाली. तर अंदाजानुसार, यातील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर नगरसेविका संपदा राणे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र, त्यांनी शिवसेना प्रवेश केलेला नाही. राजीनाम्यानंतर त्या काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना नेते अतुल रावराणे, तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश केला आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर यांच्यासह वैभववाडी शहरप्रमुख प्रदीप रावराणे, महेंद्र रावराणे आदी उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या सात नगरसेवकांनी दिलेले राजीनामे आणि यातील सहा जणांनी केलेला शिवसेना प्रवेश भाजपला धक्कादायक मानला जात आहे. या प्रवेशानंतर राजकीय हालचालींना जोर चढला असून नगरपंचायतीच्या निवडणुकीअगोदरच राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे आगामी निवडणूक ही शिवसेना-भाजप यांच्यातच खरी लढत होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा