आगामी स्थानिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सज्ज! – अमित सामंत :
सावंतवाडी
विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या संघर्षातून सावरत आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मांडली. शिल्पग्राम येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अमित सामंत म्हणाले, “सावंतवाडी मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांत – सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग – आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. नगराध्यक्ष पदासाठीही आम्ही तयारीत आहोत. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी आमचा पक्ष युद्धपातळीवर तयारी करीत आहे.”
महाविकास आघाडीबाबत विचारले असता ते म्हणाले, “आघाडीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. मात्र, वेळ आल्यास आम्ही स्वतंत्रपणे लढण्यासही तयार आहोत.”
अर्चना घारे-परब यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आणि त्या पक्षातच आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस, शहराध्यक्ष देवा टेमकर, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

