कुडाळ पंचायत समितीचे आरक्षण जाहीर,
१८ गणांसाठी सोडत पार
कुडाळ
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार कुडाळ पंचायत समितीच्या सदस्य पदांसाठी आरक्षणाची सोडत आज तहसिलदार कार्यालयात पार पडली. ही प्रक्रिया प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या उपस्थितीत व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली.
एकूण १८ गणांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, अनुसूचित जमातींसाठी लोकसंख्या अपुरी असल्याने त्यासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे पावशी या प्रभागापासून सोडतीला सुरुवात झाली. येथे अनुसूचित जातींची सर्वाधिक लोकसंख्या असल्याने, यावेळी पावशी प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आला.
त्यानंतर विविध प्रभागांसाठी मागासवर्गीय व महिलांसाठी आरक्षण निश्चित झाले. त्यामध्ये आंब्रड, डिगस (नागरिकांचा मागास प्रवर्ग), गोठोस आणि घावनळे या प्रभागांमध्ये महिला आरक्षण ठरले. उर्वरित १३ गणांसाठी सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर करण्यात आले.
आरक्षण चिठ्या रणवीर गावडे आणि श्रुष्टी गावडे या विद्यार्थ्यांकडून काढण्यात आल्या. या वेळी तहसिलदार वीरसिंग वसावे, नायब तहसिलदार अमरसिंह जाधव, श्री. गवस यांच्यासह अनेक कर्मचारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

