महावितरण कडून वीज कंत्राटी कामगार संघाशी १६ ऑक्टोबरला बैठक
प्रलंबित मागण्यांवर होणार चर्चा – सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद लाड
सिंधुदुर्ग –
राज्यभरात ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या वीज कामगारांच्या तीन दिवसीय संपाला वीज कंत्राटी कामगार संघाने काळ्या फिती लावून पाठिंबा दिला होता. त्यानंतर आंदोलनात थेट सहभागी होण्याआधी महावितरणने पुढाकार घेत, कंत्राटी कामगार संघटनेसोबत १६ ऑक्टोबर रोजी बैठक घेण्याचे पत्र दिले आहे. ही बैठक महावितरणचे संचालक मा. राजेंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मा. संजय ढोके यांच्या वतीने हे पत्र संघटनेला देण्यात आले आहे.
या बैठकीत हरियाणा पॅटर्नचा अहवाल मंत्रिमंडळासमोर मांडणे, दिवाळीपूर्वी वेतनवाढीच्या फरकाची रक्कम, बोनस व वेतन देणे, कंत्राटी कामगारांची संख्याबळ पुनर्रचनेनंतरही कमी न करणे, न्यायालयीन प्रकरणातील कामगारांची माहिती सुरक्षित पोर्टलवर संरक्षित कामगार म्हणून अधोरेखित करणे, कंत्राटदार बदलल्यानंतरही कामगार कायम ठेवणे आणि ‘लास्ट इन फर्स्ट आऊट’ (LIFO) तत्त्व लागू करणे अशा विविध महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे.
या बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास, डिसेंबर महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी दिला आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून योग्य तोडगा काढावा व त्यांच्या खात्यातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस व भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष मा. सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली.
या संदर्भात माहिती देताना महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांनी ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले.
