You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुधारणा प्रक्रिया गतिमान

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुधारणा प्रक्रिया गतिमान

“सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुधारणा प्रक्रिया गतिमान;

देव्या सूर्याजी यांचे डॉक्टर व रुग्णांसाठी सहकार्याचे आवाहन”

सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांवर न्यायालयीन पातळीवर चाललेल्या सुनावणीमुळे लवकरच सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अभिनव फाउंडेशनने १० वर्षांपूर्वी दाखल केलेल्या याचिकेवर कोल्हापूर खंडपीठात सुनावणी सुरू असून, न्यायालयाच्या निर्देशानुसार गठीत तथ्य शोधक समितीने नुकतीच रुग्णालयाची पाहणी करून अहवाल तयार केला आहे. याच दरम्यान, आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी देखील रुग्णालयास भेट देऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला.

या पार्श्वभूमीवर रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य दुर्गेश उर्फ देव्या सूर्याजी यांनी अत्यंत संतुलित व जबाबदारीची भूमिका बजावत, नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि सेवेत कार्यरत डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी व रुग्णांप्रती सहकार्य करण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे.

सूर्याजी म्हणाले की, “रुग्णालयातील सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आणि रुग्णांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येकाने सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. ही बाब सध्या न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे कुठल्याही अफवांपासून दूर राहून डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे अधिक गरजेचे आहे.”

तथ्य शोधक समितीत आरोग्य उपसंचालक व महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य ॲड. संग्राम देसाई यांचा समावेश असून त्यांनी निष्पक्ष व पारदर्शक अहवाल सादर केला जाईल, याचा विश्वास दिला आहे. तसेच, एमडी फिजीशियन, न्युरोलॉजिस्ट व अन्य वैद्यकीय पदे रिक्त असल्याने ती तातडीने भरली जावीत, अशी सूचनाही सचिवांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

सध्या १०० खाटांच्या या रुग्णालयात दररोज सुमारे ४०० बाह्यरुग्ण तपासले जातात. याशिवाय प्रसूती व इतर अत्यावश्यक सेवाही येथे सुरू असतात. त्यामुळे रुग्ण व कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व नागरिक, सामाजिक संस्था आणि प्रशासनाने एकत्रितपणे सहकार्य करणे अत्यावश्यक असल्याचे देव्या सूर्याजी यांनी ठामपणे नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा