You are currently viewing चांभार ..! अनवाणी मंदीर!!

चांभार ..! अनवाणी मंदीर!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चांभार ..! अनवाणी मंदीर!!*

 

त्या तिथे.. कुठेतरी

तो बसला असायचा

सभोवती कोंडाळा.. अनवाणी

मंदीराशी.. जमला असायचा..!

 

अनवाणी पायांना झपाटून

तो..मायेने जोड द्यायचा

शिवत घासत चमकवत

स्वतःचं पोट भरायचा..!

 

त्याला टेकूनच सजीव

मूकं .. झाडं उभ होतं

अनवाणी मंदीराला गर्भगृही

हिरवी ..सावली देत होतं ..!

 

रस्त्याला वाटलं..मोठं व्हावं

तो …गर्वाने मोठा झाला

झाडाला जायचं नव्हतं

रस्ता ..त्याला घेवून गेला..!

 

चांभाराला कुणीही नाही विचारलं

शिवणारे हात तो जोडून निघून गेला

पाय माणसांचे त्याला शोधत राहिले

रस्ताही स्मार्ट होतांना त्याला विसरला

 

रस्त्याने जाताना.. आजही

पाय ..हलकेचं थबकतात

तो.. इथेच कुठेतरी बसायचा

पायचं त्याची आठवण जपतात

मंदिराची आठवण अनवाणी पाय

आजही जपतात….

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा