समुद्र किनाऱ्यावरील जीवितहानी टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 रोबोटिक वॉटर क्राफ्ट
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात समुद्राला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. समुद्रात बुडत असणाऱ्या व्यक्तीला तात्काळ वाचविता यावे या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एकूण १३ स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्ट जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्ग च्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.
या प्रस्तावास पालकमंत्री नितेश राणे, यांनी मंजुरी देवून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना १३ स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्ट खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग मार्फत क्राफ्टची खरेदी करून त्याचा पुढीलप्रमाणे पुरवठा करण्यात आलेला आहे.
| अ.क्र. | तालुका | नगरपालिका/ नगरपंचायत/ ग्रामपंचायतीचे नाव | नग संख्या |
| 1 | वेंगुर्ला | नगरपालिका वेंगुर्ला | 01 |
| 2 | ग्रामपंचायत सागरतीर्थ | 01 | |
| 3 | ग्रामपंचायत उभादांडा | 01 | |
| 4 | ग्रामपंचायत शिरोडा | 01 | |
| 5 | देवगड | नगरपंचायत देवगड जामसंडे | 01 |
| 6 | ग्रामपंचायत विजयदुर्ग | 01 | |
| 7 | ग्रामपंचायत कुणकेश्वर | 01 | |
| 8 | मालवण | नगरपालिका मालवण | 02 |
| 9 | ग्रामपंचायत वायरी भूतनाथ | 01 | |
| 10 | ग्रामपंचायत तारकर्ली- काळेथर | 02 | |
| 11 | ग्रामपंचायत देवबाग | 01 | |
| एकूण | 13 | ||
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिलेल्या निर्देशानुसार रोबोटिक वॉटर क्राफ्टच्या प्रशिक्षणाचे आयोजन दि.09 व 10 ऑक्टोबर 2025 रोजी पुढीलप्रमाणे करण्यात आले होते.
| अ.क्र. | दिनांक | प्रशिक्षणाचे ठिकाण |
| 1 | 09 ऑक्टोंबर 2025 | नगरपालिका वेंगुर्ला यांचे अखत्यारीत येणारे बीच |
| 2 | उभादांडा बीच | |
| 3 | सागरतीर्थ बीच | |
| 4 | शिरोडा बीच | |
| 5 | नगरपालिका मालवण यांचे अखत्यारीत येणारे बीच | |
| 6 | वायरी भूतनाथ बीच |
| 7 | 10 ऑक्टोंबर 2025 | तारकर्ली- काळेथर बीच |
| 8 | देवबाग बीच | |
| 9 | नगरपंचायत देवगड जामसंडे यांच्या अखत्यारीत येणारे बीच | |
| 10 | कुणकेश्वर बीच | |
| 11 | विजयदुर्ग बीच |
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील समुद्र किनारी ग्रामविकास विभाग व नागरी भागातील समुद्र किनारी नगर विकास विभाग यांनी बीच सेफ्टीच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करावयाच्या आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील ज्या बिचेसवर पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात त्या बीचेस संदर्भातील ग्रामपंचायत व नगरपालिका/नगर पंचायत यांना रोबोटिक वॉटर क्राफ्ट देण्यात आलेल्या आहेत.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार दि.९ व १० ऑक्टोबर २०२५ रोजी रोबोटिक वॉटर क्राफ्टचे प्रशिक्षण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत आयोजित करण्यात आले होते. क्राफ्टचा पुरवठा करणारी कंपनी VMCC नाशिक यांच्याकडील तंत्रज्ञ अभिषेक कसबेकर व अजय लोहार यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात तलाठी, ग्रामसेवक, सागर सुरक्षा रक्षक, संबंधित ग्रामपंचायत व नगरपंचायत/ नगरपालिका कर्मचारी, कोतवाल, स्थानिक शोध व बचाव गटाचे सदस्य, मच्छिमार, आपदा मित्र, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, जलक्रीडा व्यावसायिक यांची उपस्थिती होती.
समुद्रात एखादी व्यक्ती बुडत असताना पारंपारिक पद्धतीत व्यक्तीला वाचविण्यासाठी समुद्रात किंवा पाण्यात उतरावे लागत असे. अशावेळी कधीकधी बुडणारी व्यक्ती जीवाच्या भीतीने त्याला वाचवायला आलेल्या व्यक्तीला पकडते आणि त्यामुळे वाचविणाऱ्या व्यक्तीचा देखील जीव धोक्यात येतो. यातून जीवितहानीचे प्रमाण वाढते. मात्र रोबोटिक वॉटर क्राफ्ट मुळे वाचविणाऱ्या व्यक्तीला स्वतः समुद्रात किंवा पाण्यात न जाता रिमोटच्या सहाय्याने बुडत असलेल्या व्यक्तीपर्यंत क्राफ्ट पाठवून तिला वाचविता येणार आहे. याक्राफ्ट ची रेंज ही १ किमी पर्यंत असून क्राफ्ट ही BATTERY वर चालते. याचा वेग ताशी २४ किमी असून क्राफ्ट च्या BATTERY चे चार्जिंग करण्यासाठी दीड तासाचा कालावधी लागत असून सदरची BATTERY क्राफ्ट सुरु केल्यापासून १ तासापर्यंत कार्यरत राहते. त्यामुळे ज्या ठिकाणी लाईट नाही अशा ठिकाणीही क्राफ्ट चा वापर सहज करता येतो. ही क्राफ्ट समुद्रात व्यक्तीला वाचविण्यासाठी सोडल्यावर ती आपल्याबरोबर किमान ०४ व्यक्तींना सोबत आणू शकते. या क्राफ्ट चे वजन सुमारे २२ किलो असून ही वापरण्यास अत्यंत सुलभ आहे. या क्राफ्ट मुळे समुद्रात किंवा पुरात बुडत असलेल्या व्यक्तींना वाचविणे सोपे होणार आहे. हा क्राफ्ट ही पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे.

