You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा प्रत्येक उपक्रमात पहिल्या तीन मध्ये असावा – पालक सचिव विरेंद्र सिंह

सिंधुदुर्ग जिल्हा प्रत्येक उपक्रमात पहिल्या तीन मध्ये असावा – पालक सचिव विरेंद्र सिंह

*प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा; पालक सचिवांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांचा आढावा*

 

सिंधुदुर्गनगरी :

राज्य शासनाच्या विविध योजना आणि अभियानांच्या अंमलबजावणीत सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच प्रगतीपथावर राहिला आहे. पर्यटन, आरोग्य, शिक्षण, शेती, स्वच्छता, प्रशासन या सर्व क्षेत्रांत समन्वयाने काम केल्यास हा जिल्हा इतरांसाठी आदर्श ठरेल. प्रशासनात गतीमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा उपयोग करण्याचा प्रथम मान देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच मिळत आहे. प्रशासनाने कारभारात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यावे. नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून आपला जिल्हा प्रत्येक उपक्रमांत पहिल्या तीन मध्ये राहिल यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करण्याचे, आवाहन पालक सचिव तथा सार्वजनिक विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी केले.

पालक सचिव विरेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विभागांची आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अपर पेालिस अधीक्षक नयोमी साटम, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, आरती देसाई, शारदा पोवार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध विभागांनी सादरीकरणाव्दारे केलेल्या कामाची माहिती दिली.

श्री. सिंह यावेळी म्हणाले की, शासनाच्या १५० दिवसांच्या अभियानांतर्गत सर्व विभागांनी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची वेळेत अंमलबजावणी करावी. एखादा विभाग नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित असेल तर अशा उपक्रमांचे अनुकरण इतर विभागांनी करावे. जिल्ह्याचा विकास साधत असताना सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी टिम वर्क म्हणून सर्व विभाग प्रमुखांनी योगदान द्यावे. सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या अनेक अंगांनी पुढे जात असला तरी, जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविणे हे प्रशासनाचे प्रमुख ध्येय असले पाहिजे. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि परिणामकारक पद्धतीने काम करावे, असेही ते म्हणाले.

यावेळी श्री. सिंह यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला ते म्हणाले की, आयुष्मान कार्ड, वय वंदना कार्डचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना द्या. कार्डचे वितरण करण्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करावे. जिल्ह्यातील कोणताही दिव्यांग लाभापासून वंचित राहणार नाही यावर भर द्या. जिल्ह्यातील रुग्णालयांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करुन रुग्णांना सेवा द्या. मोबाईल मेडीकल युनिटव्दारे तळागाळातील रुग्णांपर्यंत पोहचा असेही ते म्हणाले.

जिल्हा नियोजन समितीव्दारे प्राप्त निधी वेळेत खर्च करा. विकास कामे करताना ते गुणवत्तापूर्ण असतील यावर भर द्या. विकास निधी अखर्चित राहणार नाही याची सर्व यंत्रणांनी दखल घ्या. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक स्तरावर उपाय योजनांवर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा