You are currently viewing शिवसेनेत राजन तेलींचा शक्तीशाली प्रवेश

शिवसेनेत राजन तेलींचा शक्तीशाली प्रवेश

सावंतवाडीत जंगी स्वागत सोहळा; निलेश राणेंची उपस्थिती ठरली आकर्षणाचे केंद्र

आगामी निवडणुकांपूर्वी शिवसेना संघटनात नवा जोश

 

सावंतवाडी :

सिंधुदुर्गातील राजकारणात नवा उत्साह निर्माण करणारी घटना म्हणजे माजी आमदार राजन तेली यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथे झालेल्या स्वागत सोहळ्याने वातावरण उत्साहपूर्ण झाले.

या कार्यक्रमात निलेश राणे यांनी सांगितले, “राजन तेली यांच्या प्रवेशामुळे पक्ष अधिक सक्षम झाला आहे. पक्ष वाढवणे हा प्रत्येकाचा अधिकार असला तरी मित्रपक्षाला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आपल्या कार्यातून रेष मोठी करण्यावर भर द्यावा.”

ते पुढे म्हणाले, “शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या वाढत आहे, कारण पक्ष लोकांच्या मनात पोचला आहे. दीपक केसरकर यांच्या कार्यामुळे सावंतवाडीतील विकास गतीमान झाला असून राजन तेलींचा अनुभव पक्षाला नवी दिशा देईल.”

यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब, उपनेते अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, तालुकाप्रमुख बबन राणे, शहरप्रमुख खेमराज (बाबू) कुडतरकर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी आमदार राजन तेली यांनीही आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे, मंत्री उदय सामंत आणि आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानले. ते म्हणाले, “ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत. युती झाली तरी ठीक, नाही झाली तरी ठीक — निर्णय वरिष्ठ नेत्यांचा असेल, पण आम्ही जिल्ह्याला भरघोस निधी मिळवून देऊ.”

दरम्यान, जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सांगितले की, “शिवसेना निवडणुकीसाठी पूर्ण सज्ज आहे. आमच्या पाठीशी केसरकर, राणे, सामंत आणि आता तेली यांची साथ आहे. शिवसैनिक लढवय्या आहे आणि तो लढायलाच हवा.”

राजन तेलींच्या प्रवेशामुळे शिवसेनेला संघटनात्मक बळ मिळाले असून, सिंधुदुर्गातील बालेकिल्ला आणखी मजबूत करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा