फोंडाघाट घाटरस्त्याच्या दुरवस्थेवरून संतप्त प्रतिक्रिया
आंदोलनाची तयारी, अनंत गंगाराम पिळणकर यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट घाट रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत गंगाराम पिळणकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांना निवेदनाद्वारे तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
फोंडाघाट परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे, चिखल व निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू असून त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. देवगड-निपाणी राज्य महामार्गाचे काम निखिल कन्स्ट्रक्शन या कंपनीमार्फत सुरू असून, त्यांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पिळणकर यांनी कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे.
“घाट रस्त्यावर कुठलीही सुरक्षा यंत्रणा नाही, अपघातांना आमंत्रण दिलं जात आहे. अलीकडेच ओरोस येथे एका महिला शासकीय अधिकाऱ्याचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला, तरीही प्रशासन झोपेत आहे,” असे म्हणत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागालाच या अपघातांस जबाबदार धरले.
पिळणकर यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, जर लवकरात लवकर खड्डे बुजवले गेले नाहीत आणि रस्त्याच्या दर्जेदार दुरुस्तीस सुरुवात झाली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली घाट रस्ता रोखून तीव्र आंदोलन छेडेल.
या निवेदनप्रसंगी त्यांच्यासोबत रुपेश जाधव (जिल्हा चिटणीस), महेश चव्हाण (तालुका उपाध्यक्ष), उत्तम तेली (विभाग अध्यक्ष), देवेंद्र पिळणकर (विधानसभा युवक अध्यक्ष), संतोष चव्हाण, तेजस पिळणकर आणि सुजल शेलार उपस्थित होते.
पक्षाने सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांच्यासह अधीक्षक अभियंता व राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडेही ही मागणी पोहचवली आहे.

