भारतातील 45 मुलांमधून मारली बाजी : महाराष्ट्रातील फक्त चौघेच पात्र
तळेरे : दत्तात्रय मारकड
भारत सरकारच्या हरित सेनेच्या वतीने निवडण्यात आलेल्या 45 देशपातळीवरील विद्यार्थ्यांमध्ये देवगड तालुक्यातील मुटाट हायस्कूलचा इयत्ता-दहावीतील कू.पार्थ परांजपे याची भविष्यातील ‘निसर्ग शास्त्रज्ञ ‘म्हणून राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे .
भारत सरकार व निकॉन कंपनी सोबत भागीदारी मध्ये असलेल्या एन टी या प्रकल्पाचा मुख्य उद्देश स्थानिक वनस्पती व जीवशास्त्र या विषयी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यातील संभाव्य निसर्ग शास्त्रज्ञ म्हणून सक्षम बनवणे. त्यासाठी मोदी सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने संपूर्ण भारतभर सर्व घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशातील 45 विद्यार्थ्यांचा शोध घेतला गेला आहे. यासाठी दिल्ली येथून अशा संशोधक मुलांची ऑनलाईन मुलाखत जानेवारी महिन्यात घेतली गेली होती .मुलाखतीसाठी भूतकाळ व भविष्यातील वाटचाल याविषयी तज्ज्ञांमार्फत विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली होती .कु.पार्थ परांजपे यांनी कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यात असणाऱ्या ‘खारफुटीच्या वनस्पतीसाठी’ प्राधान्यक्रम दिला होता .
४ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथून पार्थ अनिल परांजपे यांची निवड झाल्याचे कळविण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्यातून या उपक्रमात फक्त ४विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.तर
तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी ठरला आहे. महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांमध्ये पुणे ,रायगड ,मुंबई येथील अन्य तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
या मुलाखतीसाठी विद्यालयाचे राष्ट्रीय हरित सेनेचे उपक्रमशील शिक्षक अनिल घुगे यांनी विभागीय वन अधिकारी सिंधुदुर्गचे श्री. बागडे , मुंबई येथील डब्ल्यू डब्ल्यू एफ चे शिक्षण अधिकारी स्वानंद गावडे तसेच वनक्षेत्रपाल श्री. सोनवडेकर , वनपाल प्रकाश तळेकर व तळेरे वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली कु. पार्थची तयारी करून घेतली होती.त्याने ग्रामीण भागातून मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
वरील सर्वांनी पार्थला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ऑनलाईन प्रशिक्षण होणार आहे .यासाठी त्याला भारत सरकार व निकॉन कंपनीच्या वतीने टॅब,उच्च दर्जाची दुर्बीण व अन्य साहित्य दिले जाणार आहे .पार्थच्या करिअरच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे.
यासाठी मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विश्वासराव पाळेकर ,सुभाष चंद्र परांजपे ,शिवाजी राणे, जितेंद्र साळुंखे, डॉ. केळकर ,रघुनाथ पाळेकर, श्रीकृष्ण सोवनी,भास्कर पाळेकर व शाळेचे मुख्याध्यापक श्री.घरपणकर शिक्षक ,कर्मचारी, पालक यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या छोट्या शास्त्रज्ञांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कु. पार्थ अनिल परांजपे हा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला विद्यार्थी असून तो उत्तम कवी, कथाकार, गायक,वादक व चिंतनशील विद्यार्थी म्हणून वर्गात परिचित आहे. सिंधुदुर्गातील खारफुटी वनस्पती व त्या संदर्भात असलेल्या समस्याबाबत सखोल संशोधन करण्याचा मनोदय दिल्लीतून घेतलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केला आहे.