इन्सुली बिलेवाडी शाळा क्र. ७ मध्ये भावुक निरोप समारंभ,
शिक्षक–ग्रामस्थांच्या ऋणानुबंधांना सलाम
इन्सुली
इन्सुली बिलेवाडी (ता. सावंतवाडी) येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ७ मध्ये शिक्षक श्री. आरोसकर सर आणि आरोसकर मॅडम यांचा निरोप समारंभ अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या तसेच ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि संपूर्ण बिलेवाडी अश्रुमय वातावरणाने भारावून गेली.
हा निरोप समारंभ अत्यंत आगळा–वेगळा ठरला असून संपूर्ण महाराष्ट्रभर या कार्यक्रमाची चर्चा आणि कौतुक होत आहे. शिक्षक व शिक्षिकेच्या कार्याचा गौरव करत ग्रामस्थांनी शिक्षकी पेशाचे ऋण फेडण्याचा अनोखा प्रयत्न केला.
या प्रसंगी शिक्षक म्हणून बदली होऊन आलेले श्री. दिलीप चव्हाण सर आणि श्री. महेश सावंत सर यांचेही उत्साहात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अशोक सावंत होते. या कार्यक्रमास इन्सुली केंद्रप्रमुख श्री. लक्ष्मीदास ठाकूर, शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष श्री. विठ्ठल गवस, उपसरपंच सौ. नमिता नाईक, सोसायटी सदस्य श्री. हरिश्चंद्र तारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संतोष सावंत, उपाध्यक्ष सौ. संजना सावंत तसेच श्री. नरेंद्र सावंत, झुलू सावंत, संतोष मांजरेकर, शाम कोठावळे, प्रवीण सावंत, निलकंठ कोठावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक श्री. विनोद गावकर सर यांनी केले. प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन श्री. गजेंद्र कोठावळे यांनी केले.
शिक्षक आणि ग्रामस्थ यांमधील घट्ट ऋणानुबंधांची जाणीव करून देणारा आणि महाराष्ट्रभर चर्चेत आलेला हा निरोप समारंभ, इन्सुली बिलेवाडीच्या एकजुटीचे प्रतीक ठरला.

