*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शारद पौर्णिमा..*
शारद पौर्णिमेला होई,
चांदणी बरसात l
पूर्ण चंद्रबिंब शोभे,
निळ्या अंबरात ll धृ ll
श्रावण भाद्रपदी
मेघ बरसून गेला l
कृष्णकुंतल लावण्य
निसर्ग देत गेला l
कोजागिरी रात्री,
शिवपार्वती फिरतात ..
पूर्ण चंद्रबिंब शोभे,
निळ्या अंबरात ll1ll
आली सोन किरणे,
रवीराज प्रकटला!
दाखवी पोपटी राने,
धनधान्य पौर्णिमेला!
धनधान्याची समृद्धी,
दिसे शरद काळात !
पूर्ण चंद्रबिंब शोभे,
निळ्या अंबरात ll2ll
ओल्या तांदळाची खीर,
पौर्णिमेला खास !
सर्वांमुखी मिळतसे
आनंदाचा घास!
भाताच्या दिसती लोंबी,
दूर शिवारात!
पूर्ण चंद्रबिंब शोभे,
निळ्या अंबरात ll3ll
हळवं भात पाहून रानी,
राजा शेतकरी हसे!
त्याच्या हास्यातच सारी,
धन दौलत दिसे !
सुखे ओसंडे शेतकऱी
भाताच्या ढिगात!
पूर्ण चंद्रबिंब शोभे,
निळ्या अंबरात !
उज्वला सहस्रबुद्धे

