“पुरस्कारांचा बाजार”…
अँड.नकुल पार्सॅकर.
दोन दिवसांत मला एका फाऊंडेशन कडून फोन आला.फोनवर एक मुलगी गोड आवाजात बोलत होती.”आपण सामाजिक कार्यकर्ते नकुल पार्सॅकर का?मी हो म्हणालो,” असे कामानिमित्त किंवा मदतीसाठी अनेक फोन येत असतात. त्यामुळे मी तिला प्रतिसाद दिला.ती म्हणाली,” सर आम्ही तुमच्या बद्दल माहिती काढली,तुम्ही खूप चांगल सामाजिक काम करता,त्यामुळे आमच्या फाऊंडेशनने तुम्हांला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरवले आहे,त्यासाठी तुमची परवानगी हवी.तुम्ही इंटरेस्टेड आहात का?..वगैरे…वगैरे…मी म्हणालो,” मला तुमच्या संस्थेची माहिती पाठवा,विचार करून सांगतो.” असे सांगून मी फोन कट केला.दोन दिवस मला त्या मुलीने काहिच माहिती पाठवली नाही…माञ आज तिचा पुन्हा फोन आला,” सर काल एक गोष्ट सांगायला विसरले ,तुम्ही ऑनलाईन आमच्या नंबरवर पाच हजार रुपये पाठवा..पुरस्काराची तारीख ठरली की कळवणार…मी त्या मुलीला सांगितले..हल्ली मुंबईच्या चोर बाजारात पण असे अमुक तमुक भूषण,जीवनगौरव पुरस्कार मिळतात.” माझा रोख पाहून त्या मुलीने फोन बंद केला.
गेल्या काही वर्षांत पुरस्कार हा शब्दचं एवढा बदनाम झालेला आहे की आजकाल गुन्हेगारांनाही पुरस्काराने सन्मानित केल जात. दिवसेंदिवस समाजाची चौकटचं विस्कळीत होत आहे.चारित्र्यहीन लोक शाहू,फुले,आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून आपली प्रतिमा उजळण्याचा खटाटोप करत आहे…आणि आपण या सगळ्या खोट्या गोष्टीना प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत असतो. काही तुरळक अपवाद वगळता राजकीय वरदहस्तामुळे लायकी नसताना पुरस्कार दिले जातात. काही मंडळावर नियुक्त्या पण केल्या जातात. पाञता एवढीच असते हे पुरस्कार मिळवण्यासाठी मंञी,आमदार,खासदार यांची मनोभावे सदासर्वकाळ भाटगिरी केली पहिजे.
मी जेव्हा एखाद्या अडलेल्या पडलेल्यांना मदत करतो,मग ती वैद्यकीय उपचाराची समस्या असेल,शैक्षणिक वा रोजगाराची समस्या असेल ती माझ्या क्षमतेनुसार सोडवतो व ज्याचे काम झालेले असेल तेव्हा जे आशिर्वाद मिळतात हाच माझ्यासाठी जीवनगौरव पुरस्कार.
मी पाहिलयं भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्याना व्हाईट कॉलर गुन्हेगार आपल्या संस्थेमार्फत असे विविध पुरस्कार देत असतात. असे पुरस्कार देऊन समाजात नेमका काय संदेश द्यायचा असतो हे मला न समजलेले कोड आहे.या तांत्रिक युगात हा पुरस्कारांचा बाजार असाच सुरू रहाणार हे निश्चित.

