You are currently viewing रामेश्वर संस्थानच्या गणरायाला भक्तिभावात निरोप

रामेश्वर संस्थानच्या गणरायाला भक्तिभावात निरोप

रामेश्वर संस्थानच्या गणरायाला भक्तिभावात निरोप – विसर्जन मिरवणुकीला भाविकांचा जनसागर

आचरा – मालवण

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान, कसबा आचरा येथील विघ्नहर्त्या गणरायाला शनिवारी ३९ दिवसांच्या भक्तिमय उत्सवानंतर सायंकाळी उशिरा भावपूर्ण वातावरणात आचरा समुद्र किनारी महाआरतीनंतर निरोप देण्यात आला. या पारंपरिक आणि उत्साही मिरवणुकीने अखेरची सांगता होताच संपूर्ण आचरा गाव भक्तिभावाने न्हालं होतं.

गणेशोत्सवाच्या ३९ दिवसांत रामेश्वर देवस्थान समिती आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून किर्तन, दशावतार, फुगडी स्पर्धा, डबलबारी भजन स्पर्धा, रेकॉर्ड डान्स, व्हरायटी शो, ऑर्केस्ट्रा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शनिवारी दुपारी गणपती विसर्जन मिरवणूक रामेश्वर मंदिरातून पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात सुरू झाली. मिरवणूक आचरा तिठा, बाजारपेठ, गाउडवाडी मार्गे श्री देव चव्हाटा येथे पोहोचली. तेथून पिरावाडी ग्रामस्थांच्या पुढाकाराने बाप्पाला आचरा समुद्र किनारी नेण्यात आले. मावळत्या सूर्याच्या साक्षीने सायंकाळी उशिरा महाआरती करत गणरायाला साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.

या मिरवणुकीत जय भवानी म्युझिकल बॅंजो पथक (बोरीवली), स्वराज्य ढोल पथक, पिरावाडी महिला ढोल पथक यांचा सहभाग होता. ठिकठिकाणी भाविकांनी रांगोळी, तोरणे, फुलांची उधळण करत गणरायाचे स्वागत केले. तसेच मिरवणुकीतील सहभागी भाविकांसाठी थंड पाणी, लाडू-मोदकांचे वाटप करण्यात आले.

आचरा तिठा येथे विविध कवायती सादर करून मिरवणुकीत विशेष रंगत आणली. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात समुद्र किनारी विसर्जन सोहळा पार पडला.

यावेळी आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी आढाव यांनीही मिरवणुकीस भेट दिली. भक्तांच्या प्रचंड उपस्थितीमुळे विसर्जन मिरवणूक जनसागरात परावर्तित झाली होती.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा