शेळपी रस्त्यावर भीषण अपघात – परुळे येथील तरुणाचा जागीच मृत्यू
वेंगुर्ला
शेळपी रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात परुळे-गवाणवाडी येथील एक तरुण जागीच ठार झाला. प्रशांत गुरुनाथ दाभोलकर (वय ३२) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रशांत दाभोलकर हे मध्यरात्री आपल्या दुचाकीने जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकी घसरली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या दगडाला जोरात आदळली. या धडकेत प्रशांत रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर दुचाकी रस्त्याच्या बाजूला पडलेली आढळली असून, धडकेमुळे रस्त्यावरील दगडही निखळला होता.
प्रशांत दाभोलकर हे अत्यंत मेहनती आणि कष्टाळू तरुण म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने परुळे-गवाणवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण, काका-काकी असा मोठा परिवार आहे.
या अपघाताची नोंद निवती पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

