You are currently viewing शिरोडा बीच दुर्घटना :

शिरोडा बीच दुर्घटना :

शिरोडा बीच दुर्घटना : चौथा मृतदेह सापडला, उर्वरित तिघांचा शोध सुरूच

वेंगुर्ले,
शिरोडा–वेळागर समुद्रकिनारी शुक्रवारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत बुडालेल्या पर्यटकांपैकी चौथ्या पर्यटकाचा मृतदेह शुक्रवारी रात्री सागरतीर्थ किनारी सापडला. मृत तरुणाचे नाव फरहान असे असून, तो बेपत्ता झालेल्या चार जणांपैकी एक होता.

दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार मत्स्य विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या ड्रोनच्या मदतीने उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. तसेच फिशिंग बोटी व प्रशासनाकडून किनारपट्टीवर शोधमोहीम राबवली जात आहे, अशी माहिती तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली.

ही दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी ४:४५ च्या सुमारास घडली. कुडाळ व बेळगाव येथून आलेली दोन कुटुंबे शिरोडा समुद्रकिनारी पर्यटनासाठी आली होती. अंघोळीसाठी पाण्यात उतरलेल्या नऊ जणांना अचानक आलेल्या प्रचंड लाटेमुळे समुद्रात ओढले गेले. स्थानिकांच्या मदतीने पाच जणांना वाचवण्यात आले, त्यातील दोघे बचावले तर तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

चार जण बेपत्ता होते. त्यातील फरहानचा मृतदेह रात्री १० वाजण्याच्या सुमारास सागरतीर्थ किनारी सापडला. उर्वरित तिघांचा शोध सुरू असताना एका व्यक्तीचा मृतदेह काही वेळासाठी कडोबा किनाऱ्यालगत दिसून आला, मात्र तो पुन्हा समुद्रात वाहून गेला.

प्रशासन, मत्स्य विभाग, पोलीस, स्थानिक मच्छीमार, आणि बचाव पथके मिळून संयुक्तपणे शोध मोहीम राबवत आहेत. समुद्र अजूनही खवळलेला असल्यामुळे शोध मोहिमेला अडथळे येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा