_*मुंबई विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये भोसले इन्स्टिटयूटचे ऑफ टेक्नॉलॉजीचे यश…..*_
_*रायफल शूटिंग, बुद्धिबळ व बॅडमिंटन या प्रकारात इंटर-झोनल फेरीत प्रवेश…..*_
सावंतवाडी
_यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये जिल्हास्तरावर यश संपादन करून इंटर झोनल फेरीत प्रवेश मिळवला आहे._
_वेंगुर्ला येथे झालेल्या नेमबाजी स्पर्धेत द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शमित लाखे याने पीप साईट रायफल शूटिंगमध्ये २०० पैकी १८१ गुण मिळवत सुवर्ण पदक व सर्वोत्कृष्ट कामगिरीचा चषक पटकावला. प्राची कांबळी हिने ओपन साइट रायफल शूटिंगमध्ये कांस्यपदक मिळवले. कुडाळ येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन महिला बुद्धिबळ स्पर्धेत कॉलेजच्या महिला संघाने उपविजेतेपद पटकावले. यात आर्या प्रभुदेसाई, सावनी जाधव, सानिका काळसेकर आणि अश्विनी भोगण या विद्यार्थिनींचा समावेश होता._
_बॅडमिंटन स्पर्धेत द्वितीय वर्ष कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधील रुद्र शिरोडकर याच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली. सर्व विद्यार्थी मुंबईतील इंटर झोनल फेरीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना प्रा.एस.जी.केरकर आणि प्रा.पी.एस.चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कॉलेजचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी अभिनंदन केले व पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या._

