सावंतवाडी :
सावंतवाडीतील राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने मेंगलोर, कर्नाटक येथे झालेल्या आरसीसी आंतरराष्ट्रीय ब्लिट्ज रेटिंग बुदधिबळ स्पर्धेत रेटिंग कॅटेगरीत तिसरा क्रमांक पटकावला. भारतासहीत अमेरिका, कॅनडा, श्रीलंका, केनिया या देशातील तब्बल सहाशे खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. एक ग्रँडमास्टर आणि सात इंटरनॅशनल मास्टरनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. बाळकृष्णने उत्कृष्ट खेळ करत तेरा राऊंड्समध्ये नऊ राऊंड्स जिंकून आणि एक राऊंड बरोबरीत सोडवून साडेनऊ गुण केले. मान्यवरांच्या हस्ते त्याला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. बाळकृष्णने या स्पर्धेत आपले आंतरराष्ट्रीय रेटिंग पासष्ट गुणांनी वाढवले. बाळकृष्ण बुदधिबळमधील क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्ज या तीन्ही फाॅर्मेटमधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचा खेळाडू आहे.
मुक्ताई ॲकेडमीचा खेळाडू पुष्कर राधाकृष्ण केळूसकर याने बाळकृष्ण सोबत पहिल्यांदाच आरसीसी आंतरराष्ट्रीय ब्लिट्ज रेटिंग बुदधिबळ स्पर्धेत सहभाग घेऊन दमदार खेळ केला. पुष्करने तेरा राऊंड्समध्ये पाच राऊंड्स जिंकून आणि एक राऊंड बरोबरीत सोडवून साडेपाच गुण केले. त्याने दोन रेटेड खेळाडूंना हरवून, एका रेटेड खेळाडूसोबत बरोबरी केली. पुष्कर आंतरराष्ट्रीय रॅपिड रेटेड खेळाडू असुन त्याला ब्लिट्ज फाॅर्मेटमधील रेटिंग मिळवता येणार आहे. सर्व स्तरातून बाळकृष्ण आणि पुष्करचे कौतुक करण्यात येत आहे.

