You are currently viewing जीवनात खाली हाताने आलो, तर खाली हातानेच जाणार –  सौ.नेहा भाबल

जीवनात खाली हाताने आलो, तर खाली हातानेच जाणार –  सौ.नेहा भाबल

मुंबई :

आम्हा भावंडांसाठी आई-वडिलांनी घेतलेले अपार कष्ट व केलेले चांगले संस्कार, यामुळे मी इथवर पोहोचू शकले. वास्तविक पाहता शालेय जीवनात माझा शिक्षकी पेशाकडे ओढा होताच, असे उद्गार भांडुप गावच्या शिवाई विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ.नेहा लघुत्तम भाबल (पूर्वाश्रमीच्या विजया तांडेल) यांनी आपल्या सेवानिवृत्तीवर सत्कार सोहळ्यात व्यक्त केले.

समारंभाचे प्रास्ताविक करताना सौ. अश्विनी खानोलकर यांनी मुख्याध्यापिका सौ. भाबल यांनी ३९ वर्षे ८ महिन्यांची प्रदीर्घ सेवा बजावताना अनेक विद्यार्थी घडवल्याचे सांगितले. सत्कार दाखवला आपले मनोगत व्यक्त करताना सौ. भाबल यांनी, शाळेचे संस्थापक कै.सदाशिव भोईर यांनी लिपिक म्हणून दाखल करून घेतल्यावर एका वर्षातच शिक्षिका म्हणून कर्तव्य बजावण्याची संधी दिली. तेथूनच शिक्षिका म्हणून प्रवास सुरू झाल्याचे नमूद केले. जीवनात येताना खाली हाताने आलो तर खाली हाताने जाणार, याचे स्मरण ठेवल्यानेच यशस्वी होता आले. दरम्यान या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला सहकार्याचा हात दिला, त्या सर्वांची मी कृतज्ञता व्यक्त करते असे प्रतिपादन केले.

यावेळी माजी मुख्याध्यापक विश्वास धुमाळ, संध्या पांडे, वंदना दीक्षित, डॉ.रंजना तामोरे, पत्रकार दत्तप्रसाद शिरोडकर, संदीप तांडेल,वर्षा केणी, सुधा पराडकर, लघुत्तम भाबल, शशिकांत तामोरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर प्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक रत्न भालेराव, माजी मुख्याध्यापक जनार्दन गोळे, संगीता वालावलकर, अश्विनी आयरे, मयुरेश भोईर व ज्येष्ठ शिक्षिका तनुजा भाये आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी सौ. मृणाल मयुरेश भोईर यांनी सौभाग्याचे लेणे प्रदान करून नेहा भाबल यांना सन्मानित केले. यावेळी इतर संस्थांच्या वतीनेही त्यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. समारंभाच्या अध्यक्षा गौरी भोईर यांनी नेहा भाबल यांच्या कार्याचा गौरव करून, त्यांच्या जागी तनुजा भाये यांची मुख्याध्यापिका म्हणून नियुक्ती केल्याचे सांगून दोघींनाही शुभेच्छा दिल्या. या रंगतदार सोहळ्याचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सुरेखा उजगरे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा