You are currently viewing शारदोत्सव निमित्ताने जमा शैक्षणिक साहित्य पूरग्रस्त विद्यार्थ्यांना

शारदोत्सव निमित्ताने जमा शैक्षणिक साहित्य पूरग्रस्त विद्यार्थ्यांना

*शारदोत्सव निमित्ताने जमा शैक्षणिक साहित्य पूरग्रस्त विद्यार्थ्यांना*

*पीएम श्री बांदा केंद्रशाळेत राबविला अनोखा उपक्रम*

*बांदा*

कोकणात दरवर्षी शाळांमध्ये सरस्वती पूजन कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, आणि ग्रामस्थ एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात. या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, तसेच शाळेच्या भौतिक गरजांसाठी लोकांचे सहकार्य प्राप्त होते.
जिल्हा परिषद पीएम श्री बांदा नं. १ केंद्र शाळेमध्ये दरवर्षी शारदोत्सवाचे आयोजन अत्यंत विशेष पद्धतीने केले जाते‌. या वर्षी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पाठविण्यासाठी शारदोत्सवाच्या निमित्ताने श्री देवी सरस्वतीला शैक्षणिक साहित्य अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाला शाळेतील विद्यार्थी, पालक, आणि ग्रामस्थ यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सरपंच प्रियांका नाईक तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर यांच्यासह सहजसेवा सेवायोग परिवार बांदा यांनी या उपक्रमाला सहकार्य केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य वही, पेन, पेन्सिल, चित्रकला वही, रंगसाहित्य इत्यादी मोठ्या प्रमाणावर श्री देवी सरस्वतीला अर्पण केले.
मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या या साहित्याची मदत उमेद फाउंडेशनच्या माध्यमातून मराठवाड्यातील धाराशिव, बीड, सोलापूर, आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील पूरग्रस्त शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवली जाईल.
या उपक्रमाबद्दल बोलताना बांदा केंद्र शाळेतील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक उपक्रमशील जे.डी. पाटील यांनी सांगितले की, शालेय वयातच विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी म्हणून राबविला हा उपक्रम विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थांनीही अत्यंत उत्साहाने स्वीकारला. पुढील काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नवरात्र मंडळ आणि देवस्थान समित्या यांच्या सहकार्याने अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य संकलन होईल, अशी आशा व्यक्त केली. असे जमा केलेले आपल्या परिसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत म्हणून देता येईल.
या उपक्रमाला बांदा केंद्र शाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर व सहकारी शिक्षकांबरोबर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे व सदस्य यांचे देखील या उपक्रमात महत्त्वाचे योगदान लाभले.
शारदोत्सवाच्या निमित्ताने एकत्र झालेले शैक्षणिक साहित्य, एकाच वेळी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आणि गरजवंतांना मदत करणारे ठरले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा