मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर डकवर्थ-लुईस पद्धतीने ५९ धावांनी विजय मिळवून मोहिमेला जोरदार सुरुवात केली. दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीमुळे संघाला विजय मिळवता आला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ४७ षटकांत ८ बाद २६९ धावा केल्या. प्रारंभी स्मृती मानधना ८ धावांवर बाद झाल्यामुळे संघाला धक्का बसला, पण सातव्या विकेटसाठी दीप्ती आणि अमनजोत यांच्या शतकी भागीदारीमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या गाठण्यात मदत झाली. अमनजोतने ५७ तर दीप्तीने ५३ धावा केल्या, तर स्नेह राणा २८ धावा करून नाबाद राहिली. श्रीलंकेच्या इनोका रणवीराने चार विकेट्स घेतल्या, उदेशिका प्रबोधनीने दोन, तर चामारी अटापट्टू आणि अचिनी कुलसुरियाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
सामन्यात पावसामुळे दोनदा व्यत्यय आला. डीएलएस पद्धतीने लक्ष्य २७१ धावांवर निश्चित करण्यात आले, परंतु भारतीय गोलंदाजांनी प्रत्येक टप्प्यावर दबाव ठेवत श्रीलंकेला लक्ष्य गाठू दिले नाही. प्रतिस्पर्धी संघ ४५.४ षटकांत २११ धावांवर सर्वबाद झाला. दीप्तीने गोलंदाजी करताना तीन विकेट्स घेतल्या, तर स्नेह राणा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
भारतीय संघाने नियमित अंतराने विकेट गमावल्या, परंतु सातव्या विकेटसाठी दीप्ती आणि अमनजोतची शतकी भागीदारी संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरली. हर्लिन देओलने ४८ धावा केल्या, कर्णधार हरमनप्रीत कौर २१, मानधना ८, रिचा घोष २ आणि स्नेह राणा २८ नाबाद राहिली.
सामन्याच्या मध्यंतरादरम्यान एसीए बरसापारा स्टेडियममध्ये बॉलिवूड गायिका श्रेय घोषालने दिवंगत आसामी गायक झुबीन गर्ग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहली. तिने संक्षिप्त पण प्रभावी सादरीकरणात झुबीनची लोकप्रिय गाणी आणि विश्वचषकातील थीम सॉंग “ब्रिंग इट होम” सादर केली. “जय झुबीन दा” च्या जयघोषाने स्टेडियम दुमदुमून गेले.
भारतीय महिला संघाच्या दमदार कामगिरीमुळे त्यांच्या विश्वचषक मोहिमेला विजयासह धमाकेदार सुरुवात झाली असून, दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी सर्वांच्या लक्षात राहिली.
