You are currently viewing स्वयंसिद्धेकडून स्वयंपूर्णतेकडे – शारदोत्सवातील आठवी माळ प्रेरणादायी

स्वयंसिद्धेकडून स्वयंपूर्णतेकडे – शारदोत्सवातील आठवी माळ प्रेरणादायी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

स्त्रियांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरलेली अहिल्या महिला मंडळ संस्था ही पेणसारख्या निमशहरी ठिकाणी असून, गेली अनेक वर्षे महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. आदिवासी मुलींना, गृहिणींना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देणे हे संस्थेचे वैशिष्ट्य आहे. आज या मुली डॉक्टर, वकील बनून उच्चशिक्षणापर्यंत पोहोचल्या आहेत. स्वयंसिद्धा, स्वादभारती, संजीवनी वृद्धाश्रम, स्वानंद संस्कार वर्ग असे विविध उपक्रम अहिल्या महिला मंडळात उत्साहाने सुरू असून महिलांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्याही सक्षम करण्यासाठी हे उपक्रम खऱ्या अर्थाने महिलांच्या सक्षमीकरणाचा आधारस्तंभ ठरत आहेत.

या प्रसंगी विद्यार्थिनींशी संवाद साधताना अहिल्या महिला मंडळ संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी गाडगीळ यांनी “नागरिकांनी आता स्वयंनिर्मितीपासून स्वयंपूर्णतेकडे धाव घेतली पाहिजे” असे प्रांजळ मत व्यक्त केले.

या पार्श्वभूमीवर सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालक श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, मराठी विभाग आयोजित शारदोत्सव २०२५ (वर्ष पाचवे) नवदुर्गा : नवविचार – बहुआयामी स्त्री व्याख्यानमालेतील आठवे पुष्प “स्वयंसिद्धा” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष कला शाखेतील कोमल धोत्रे हिने केले, परिचय पूजा पवार हिने करून दिला तर आभार प्रदर्शन मानसी कदम हिने केले. या कार्यक्रमाला प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. संपूर्ण कार्यक्रम आभासी पद्धतीने पार पडला, ज्यामुळे दूरदूरच्या विद्यार्थिनी व उपस्थितांना सहभागाची संधी मिळाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा