गेल्यावर्षी भारतीयांना लॉकडाऊनमध्ये गुंतवून हैराण करणा-या कोरोना विषाणूचा परतीकडे प्रवास सुरु झाल्याची चिन्हे आहेत. गेल्या २४ तासात देशातील १७ राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची एकही घटना नसल्याचे दिसून येत आहे. तसेच नव्या बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्याही लक्षणीयरित्या जास्त आहे.
गेल्या १० दिवसांपासून देशात कोरोनामुळे मरणा-यांची संख्या रोज १५० पेक्षा कमी आहे. त्यातही गेल्या २४ तासात देशभरात केवळ १०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर अंदमान व निकोबार, दमणदीव व हवेली, अरुणाचलप्रदेश,नागालँड, मिझोराम, लक्ष्यद्वीप, लद्दाख, सिक्कीम,राजस्थान, मेघालय, मध्यप्रदेश, जम्मू-काश्मीर, पूदूचेरी, आंध्रप्रदेश व आसाम या १७ राज्यांमध्ये एकही मृत्यू झालेला नाही.
रुग्णांचे तत्काळ निदान, त्यांना शोधण्यासाठी बनवलेली योग्य पद्धत तसेच उपचाराचीही योग्य पद्धत यासर्वांमुळे हा संसर्ग आटोक्यात आणता आल्याचे आरोग्यमंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. गेल्या २४ तासात देशात ११,८३१ नवे रुग्ण आढळले तर ११९०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकुण संक्रमितांचा आकडा १ कोटी ८ लाख ३८ हजारांवर गेला असून त्यातील १ कोटी ५ लाख ३४ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णमुक्तीचा दर ९७.२० टक्के इतका उच्च आहे. देशात आतापर्यंत १,५५, ०८० रुग्ण मृत झाले असून देशाचा कोरोना मृत्यूदर १.४३ टक्के इतका अत्यल्प आहे.