तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ४९ दाखल्यांचे वाटप; वेळ वाचवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन
कुडाळ :
सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनामार्फत “शाळा तिथे दाखला” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला कुडाळ तालुक्यात उत्तम प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थ्यांचा व पालकांचा वेळ वाचत आहे.
या उपक्रमांतर्गत शाळांमधूनच दाखले (कागदपत्रे) वितरित केल्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना महसूल कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत नाहीत. या दाखल्यांचा उपयोग पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी होणार असल्याने त्यांचे महत्त्व अधोरेखित केले गेले.
कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “दाखले अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते जतन करून ठेवा. प्रशासनाने शाळेत येऊन हे दाखले वितरित केल्यामुळे तुमचा वेळ वाचतो, तो वेळ अभ्यासासाठी द्या,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच शाळेच्या प्रयत्नाबद्दल त्यांनी अभिनंदनही केले.
या कार्यक्रमात एकूण ४९ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्यापैकी ५ जात प्रमाणपत्रे आणि ४४ अधिवास (निवास) प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाला नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, संस्थेचे पदाधिकारी सीए सागर तेली, मुख्याध्यापिका एस.एस. कामत, शिक्षिका श्रीमती खानोलकर, श्रीमती पडते, श्रीमती गोवेकर, श्रीमती जोशी, श्रीमती बंकापुरे, शिक्षक श्री. रासम, महसूल विभागाचे श्री. गोसावी यांची उपस्थिती होती.
उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापिका एस.एस. कामत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक श्री. रासम यांनी मानले.
