You are currently viewing बांदा-दाणोली मार्गावर उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

बांदा-दाणोली मार्गावर उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

६० लाखांचे अवैध विदेशी मद्य जप्त

सावंतवाडी :

महाराष्ट्र-गोवा सीमेवरील बांदा-दाणोली रस्त्यावर इन्सुली उत्पादन शुल्कच्या पथकाने मोठी कारवाई केली. यात बेकायदा विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे ६० लाख ०८ हजार २४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी राजस्थानमधील कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्री.राजेंद्र देशमुख, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई व. श्री. पी. पी. सुर्वे, सह आयुक्त, अंमलबजावणी व दक्षता, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विजय चिचलोकर, विभागीय उपआयुक्त, कोल्हापूर विभाग आणि श्रीम. किर्ती शेंडगे, अधीक्षक,सिंधुदुर्ग यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.

बांदा-दाणोली मार्गावर अवैध दारू वाहतुक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार हॉटेल सुभेदारच्या समोर सापळा रचण्यात आला.तपासणी करत असताना पथकाला (एमएच १४ जीयू १२३७) क्रमांकाचा कंटेनर संशयास्पद वाटला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये सिलबंद प्लास्टिकच्या २६७ गोणी मिळून आल्या. या गोण्यांमध्ये ३८,४४८ बाटल्या आढळून आल्या. या अवैध मद्याची किंमत ४९,९८,२४० इतकी आहे. अवैध मद्य आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर आणि सॅमसंग कंपनीच्या मोबाईलसह एकूण ६०,०८,२४० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी कंटेनरचा चालक जस राम (वय २५, रा. शेरपुरा, राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.ही कारवाई दुय्यम निरीक्षक विवेक कदम, जवान रणजित शिंदे, दीपक वायदंडे, सतिश चौगुले,अभिषेक खत्री आणि सागर सुर्यवंशी यांनी केली.पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा