*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा मानसी मोहन जोशी लिखित अप्रतिम लेख*
*आदिशक्ती*
ऋग्वेदातील उषासुक्तामध्ये उशाला आदितीमुखा म्हटले आहे. हिलाच अनार्वा व दिव्या गौम्भ नावाने संबोधिले जाते. रेणुका हे देवमाता अदितीचे रूप आहे म्हणून या क्षेत्राला मूळपीठ म्हणतात. वेदात रेणुकेचा उल्लेख नाही पण महर्षी जमदग्नी याचा उल्लेख वारंवार आढळतो. जमदग्नी हा प्रत्यक्ष शिवाचा अवतार मंत्रदंष्ट्रा ब्रह्मर्षी होत. ऋग्वेदाचा दशमंडलाचा द्रष्टा तसेच, उश्मांड हवन विधीचा प्रचारक तसेच ससर्परी विद्या आणि श्राद्ध विधीचा रचयिता महर्षी जमदग्नी हे होत. महर्षी जमदग्नीचे आश्रम व रीशिकुल जिथे जिथे होत तिथे तिथे रेणुका मातेचे स्थान आहेत. तरी पण मूळ स्थान म्हणजे सती स्थान माहूर किंवा मातापूर हेच मुख्य आहे. रेणुका हि अग्नी तत्वाशी संबंधित आहे. अग्नी ज्वालावर अधिष्ठित व अग्नी ज्वालावर परीवेश्ठीत रूपाचे वर्णन सर्वत्र आढळते त्यामुळे रेणुका हि अग्नी देवता आहे. देव माता अदिती हि प्रलायाग्निवर आरूढ व अग्नीवलयांकित आहे. त्या प्रमाणे चीदग्नी अग्नी संभवा रेणुका जमदग्नी बरोबर विवाह बद्ध झाली. सूर्य व अग्नी देव तिच्या पोटी पुत्र रूपाने अवतरले. विवाहाच्या वेळी दोघांनी श्रवताग्नी व चेताग्निचे व्रत ग्रहण केले व शेवट पर्यंत ते व्रत केले. व शेवटी हि अग्नीच्या चिताग्नी मध्ये लुप्त झाली व पुन्हा अग्नी मधून प्रगटली भक्त कल्याणासाठी शाश्वत रुपात प्रतिष्ठित झाली ते क्षेत्र म्हणजे माहूर. भगवती अदिती रेणुका, मूळशक्ती, अनादी शक्ती व पराब्रःमेची महाशक्ती आहे. दशावतारा मध्ये वामन व परशुराम हे दोन अवतार ब्राह्मण कुलसंभूत अवतार आहेत. दोघांची माता अदिती व रेणुका होय. परशुरामाच्या कारणामुळे पुत्र वत्सला पृथ्वीवर सदैव अधिष्ठित रेणुका हीच होय. सर्व देवी देवता अवतार कार्य समाप्ती नंतर निजधामास गेले पण रेणुका देवी अंतर्धान पावल्यावर मातेच्या ममतेने पुन्हा पृथ्वीवर प्रगटली ती कायमचीच.
स्वतः आदीशक्ती स्वरूपिणी , पतीदेव साक्षात शिव आणि पुत्र परशुराम म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार, हा त्रिवेणी संगम. आदिशक्ती सती जाताना प्रत्यक्ष महाविष्णू (परशुराम) मंत्राग्नी देत आहेत. सृष्टी संचालक त्रिदेव दत्तात्रेय सती कर्माचे पौरोहित्य करीत आहेत असा अद्भुत प्रसंग विरळाच. सतीच्या शरीराचे श्री विष्णूंनी सुदर्शन चक्राने तुकडे केले ते जिथे जिथे पडले ती सर्व ठिकाणे शक्तिपीठे बनली. माहूर क्षेत्री सतीचे स्तनद्वय पडले. मातृदेहा मध्ये वात्सल्य रसाचे स्थान म्हणजे स्तनद्वय किंवा पयोधर होय. या मातृत्वाच्या वात्सल्याचे मूळ ठिकाण म्हणजे पुरःस्थल म्हणजेच माहूर. आदिशक्तीचा वास सदैव आपल्या आजूबाजूला असतो.
प्रा.मानसी मोहन जोशी
ठाणे प.

