You are currently viewing नवरात्र…पाचवे पुष्प..२०२५

नवरात्र…पाचवे पुष्प..२०२५

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

 

*नवरात्र…पाचवे पुष्प..२०२५*

 

आज नवरात्रीच्या आजच्या पावन दिवशी अशा एका दुर्गेचा परिचय करून देत आहे, जिच्यामुळे आपले बालपण, तरुणपण आणि प्रौढपण सुकर झाले आणि अजून ही होत आहे…

 

 

किलबिल किलबिल पक्षी बोलती

झुळझुळ झुळझुळ झरे वाहती

पानोपानी फुले बहरती

फूलपाखरे वर भिरभिरती

स्वप्नीे आले काही,

एक मी गाव पाहिला बाई ………

 

 

ही कविता आठवते का आपल्याला…नक्कीच आठवत असणार…कारण बालपण या गाण्याशिवाय जाऊच शकत नव्हतं. आज ही आपण युट्यूबवर ही जुनी गाणी काढून ऐकत असतो.

या गाण्याला एक रिदम आहे…

किंवा…

 

शूर आम्ही सरदार आम्हाला

काय कुणाची भीती?

देव, देश अन्‌ धर्मापायी

प्राण घेतलं हाती !……..

 

 

हे गाणं ऐकलं तरी अंगात स्फूर्ती येते..आणि राष्ट्रप्रेम जागे होतेच…पूर्वी शाळांमधून समरगीत स्पर्धा व्हायच्या, त्यात हमखास हे गीत असायचेच.आमचं लहानपण आम्ही अशा गाण्यांवर जगलो आहे अगदी.

तर अशा या गीतांची मी आज आठवण काढते, म्हणजे नक्कीच आज मी कुणाबद्दल बोलतेय ते कळलं असेलच…

बरोबर..

 

आज आपल्या या नवरात्र स्पेशल मध्ये एका महान कवयित्री, लेखिका

 

*श्रीमती शांता शेळके*

 

यांना हे पाचवे पुष्प अर्पण करत आहे.

 

आपल्या गीतांनी समस्त मराठी रसिकांना भारावून सोडणाऱ्या या कवयित्री ने समाज मनाला भुरळ पाडली. एकापेक्षा एक त्यांची गाणी ऐकत ,अभ्यासात लहानाचे मोठे कधी झालो ते कळलेच नाही आपल्याला. नुसती गीते नाही, तर कथा , कांदबरी मध्ये सुद्धा त्यांचा हातखंडा होता. ‘ चारचौघी ‘ हि त्यांची गाजलेली कादंबरी आहे…त्यावर आधारित नाटक ही खूप लोकप्रिय आहे.

अशा प्रतिभासंपन्न लेखिका,कवयित्री बद्दल आपण जाणून घेऊयात.

 

 

शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे झाले.

आईच्या मृदू स्वभावाचे, तिच्या चित्रकलेचे, तिच्या वाचनवेडाचे संस्कार कळत – नकळत शांताबाईंवर होत राहिले. लहानपणी आजोळी गेल्यावर विविध पारंपरिक गीते, ओव्या, श्लोक त्यांच्या कानावर पडत. त्यामुळे कवितेची आवड, वाचनाची आवड, त्या संस्कारक्षम वयात रूजत गेली.

 

आचार्य अत्र्यांच्या “नवयुग’ मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले.

 

१९९६ साली आळंदी येथे भरलेल्या 69 व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. आता पर्यंतच्या या तिसऱ्या महिला संमेलनाध्यक्षा होत्या.

 

अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे .

तसेच त्यांनी बऱ्याच वृत्तपत्रांतील स्तंभांसाठी लेखन केले. इंग्रजी चित्रपटांचे भाषांतर ही त्यांनी केलेले केले .

 

 

शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या.

 

 

शांता शेळके  या प्रतिभासंपन्न  मराठी  कवयित्री  होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका,  संगीतकार,  गीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार ही होत्या.

त्यांचा हा प्रवास पहाताच थक्क व्हायला होते. एका स्त्री मध्ये एवढे गुण पहाता आश्चर्य तर वाटतेच ,पण अशा स्त्रिया काही महाराष्ट्रात कमी नव्हत्या हे ही खरे. त्यांच्या आधी किंवा समकालीन म्हणता येईल अशा

अनेक कवयित्रींनी मराठी साहित्यात आपले स्थान निर्माण केले होते, त्यापैकी काही प्रमुख नावे म्हणजे विमलताई क्रक (शौक), विमलताई (सुमती), सुमती क्षेत्रमाडे, कमलाबाई भट (ज्यांनी शांताबाईंच्या आधी कविता प्रकाशित केल्या होत्या), नलिनी दळवी (समर्थिका), शांताबाई पाठारे, शांताबाई देवधर, आशाताई भोसले (त्यांचाही कवितासंग्रह होता) आणि इतर अनेक कवयित्री. कवयित्री इंदिरा संत देखील अशाच प्रतिभा संपन्न कवयित्री होऊन गेल्या.. .त्यांची ही आठवण मला आज आली. इंदिरा संत म्हणले, की “कुब्जा” ही कविता आठवतेच.

असो…तर शांत शेळके यांच्या विषयी बोलायचे तर

शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली आहेत. हे फारसे कुणाला माहीत नसावे असे वाटते.

 

शांता शेळके यांचे शिक्षण पुण्यात हुजूरपागामधून झाले. शिक्षण घेऊन मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृतमध्ये त्यांनी एम.ए. केले, ज्यात त्यांना तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळाले.

 

 

शांता शेळके यांच्या काही महत्त्वाच्या कविता संग्रहांमध्ये ‘वर्षा’, ‘रूपसी’, ‘तोच चंद्रमा’, ‘गोंदण’, ‘अनोळख’, ‘कळ्यांचे दिवस’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘हाऊस ऑफ बॅम्बू’, ‘हिरव्या रंगाचा छंद’, ‘हे बंध रेशमाचे’ आणि ‘हे रान चेहऱ्यांचे’ यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी ‘कविता स्मरणातल्या’ यासारखी समीक्षात्मक पुस्तकेही लिहिली आहेत.

 

शांता शेळके यांच्या काही प्रसिद्ध रचना याप्रमाणे: ..’गोंदण’, ‘जन्माजान्हवी’ हे कवितासंग्रह.

‘मुक्ता आणि इतर गोष्टी’ हा कथासंग्रह,

आणि ‘स्वप्नतरंग’ ही कादंबरी त्यांची प्रमुख साहित्यकृती आहेत.

 

 

शांता शेळके यांची गाजलेली प्रसिद्ध चित्रपट गीते म्हणजे…..”शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” यांसारख्या देशभक्तीपर गीतांनी अनेकांना स्फुरण दिले.

 

शांता शेळके यांच्या ललित लेखांच्या संग्रहांमध्ये

‘पावसाआधीचा पाऊस’, ‘आनंदाचे झाड’ आणि ‘वडीलधारी माणसे’ यांचा समावेश होतो, असेही काही स्रोत नमूद करतात.

 

शांता शेळके यांचे आत्मचरित्र म्हणून “धूळपाटी” हे पुस्तक प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये त्यांच्या लहानपणाच्या आठवणी आणि आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग रेखाटले आहेत. हे पूर्ण आत्मचरित्र नसले तरी, त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू, त्यांचे लेखन आणि त्यांच्या जीवनातील अनुभवांबद्दल वाचायला मिळते.

“धूळपाटी” या पुस्तकाविषयी अधिक माहिती अशी सांगता येईल,की ‘धूळपाटी’ हे शांताबाईंच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, त्यांचे बालपण आणि त्यांच्या सहवासातील व्यक्तींबद्दलचे कथन आहे.

या पुस्तकातून वाचकांना त्यांच्या आयुष्यातील विविध टप्पे आणि समाजाचे चित्रण त्या काळातील त्यांच्या नजरेतून दिसते.

 

 

विविध साहित्यप्रकारात विहार करूनही त्यांच पहिल आणि खरं प्रेम राहिल ते कवितेवरचं. हळूवार भावकवितेपासून नाट्यगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते, चित्रपटगीते, प्रासंगिक गीते अशा विविध रूपातून त्यांची कविता आपल्याला भेटत असते. ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ – सारख्या लावणी लिहिणाऱ्या शांताबाई – या मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार होत.

 

शांताबाई बी. ए. च्या पहिल्या वर्षात असताना म्हणजे १९४१ मध्ये त्यांची पहिली कविता ‘शालापत्रक’ मासिकात छापून आली. तीही काहीशी बालगीतं या स्वरुपात. एकीकडे अनेक कवींच्या, विशेषत: माधव जूलिअन यांच्या काव्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. मात्र गोंदण (१९७५) पासून शांताबाईंची कविता कुणाच्याही अनुकरणापासून दूर असलेली कविता म्हणून, शांताबाईंच्या कवितेला चेहरा मिळाला. त्यांची कविता अधिकाधिक अंतर्मुख, चिंतनशील व प्रगल्भ होत गेली.

 

ग. दि. माडगूळकरांप्रमाणेच उत्कृष्ट भावानुकूल चित्रपट गीते लिहिणारी गीत लेखिका म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. गरजेनुसार, मागणीनुसार भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील, लता मंगेशकर, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, सलील चौधरींसारख्या अनेक संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी चालीबरहुकूम अशी अनेक गीते लिहिली. हृदयनाथ मंगेशकरांनी चाली दिलेली, सर्वांत गाजलेली लोकप्रिय गीते म्हणजे ‘वादळवारं सुटलं गं’, ‘वल्हव रे नाखवा’, ‘राजा सारंगा, राजा सारंगा’ ही होत. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या वासवदत्ता  आणि हे बंध रेशमाचे  या दोन्ही नाटकांसाठी शांताबाईंनी गाणी लिहिली.

 

अशाप्रकारे कवितेच्या विविध रूपात, विविध लेखनप्रकारात त्या रमलेल्या होत्या. संतांच्या काव्यातील सात्विकता, पंडितांच्या काव्यातील विद्वत्ता आणि शाहिराच्या काव्यातील ललितमधुर उन्मादकता शांता शेळके यांच्या कवितेत आढळते.

 

शांता शेळके यांच्या कथा ह्या त्यांनी बालपणी अनुभवलेल्या ग्रामीण जीवनाचे शब्दचित्र आहे. प्रौढ वयात अनुभवलेले शहरी जीवनातील अनुभवही नंतर त्यांच्या कथेत आले आहे. अगदी सहज रोजच्या अनुभवाप्रमाणे त्यांच्या कथा अभिव्यक्त होतात.

 

हीच बाब त्यांच्या ललित लेखनाबद्दल मांडता येते. रोजच्या दैनदिन अनुभवाला एक मानवी, वैश्विक स्तर देवून त्यांनी ललितलेखन केले आहे. मानवी जीवनाकडे बघण्याची कुतूहलपूर्ण दृष्टी, मानवी स्वभावाविषयीची उत्सुकता यापोटी मिळालेले अनुभव अतिशय चिंतनशिलतेतून शांता शेळके यांनी त्यांच्या ललितलेखनातून मांडले आहेत.

 

सौंदर्यदृष्टी, रसिकता, मानवी मनोभूमिका आणि सहजता ही शांता शेळके यांच्या साहित्याची वैशिष्टे होत. अवतीभवतीचा सामाजिक, सांस्कृतिक अवकाश त्यांनी याच सौंदर्यदृष्टीतून आणि सहजतेतून अभिव्यक्त केला आहे.

 

डेक्कन बालमित्र मंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार (१९८८),

कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचा कुसुमाग्रज पुरस्कार (१९९१),

ग. दि. माडगुळकर पुरस्कार (१९९४) इत्यादी पुरस्कार त्यांना लाभले आहेत.

त्याबरोबरच १९९६ मध्ये आळंदी येथे भरलेल्या ६९ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

 

पुढे शांताबाईंची जवळपास शंभर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वर्षा  (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह.

 

 

शांता शेळके यांना त्यांच्या साहित्यातील योगदाना बद्दल अनेक पुरस्काराने सन्मानित केले होते.

त्यापैकी…..

गदिमा गीतलेखन पुरस्कार १९९६

सुरसिंगार पुरस्कार (’मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ या गीतासाठी)

केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार (चित्रपट भुजंग)

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार (२००१)

 

 

अशा प्रतिभावान

 

कवयित्री,लेखिका….

श्रीमती शांता शेळके

 

यांना या नवरात्री निमित्ताने त्यांच्यातील दुर्गा रूपाला त्यांच्या कवी मनाला आणि आपल्याला प्राप्त असलेल्या त्यांच्या साहित्य खजिनासाठी त्यांना शतशः नमन.

🙏🙏🙏

 

……………………………………………………………

©पल्लवी उमेश

जयसिंगपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा