*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नवरात्र…सहावे पुष्प..२०२५*
आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी ज्या दुर्गे विषयी मी लिहित आहे ती सर्वपरिचित अशी दुर्गा आहे.
सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही असे म्हणले जाते.
आणि हा गळा लाभलेली गायिका म्हणजे आपली सर्वांची लाडकी अशी
*श्रीमती आशा भोसले*
आशा भोसले या नवदुर्गेचा आज आपण परिचय करून घेऊया…
मला असे वाटते, की मी त्यांचा कितीही परिचय करून दिला तरी तो अपूर्णच असेल, कारण त्या आहेतच अशा .बऱ्याच गोष्टी राहतील…कारण सगळे एका लेखात सांगणे अवघड आहे, तरी समजून घेऊ…प्रयत्न करते.
आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी महाराष्ट्रच्या सांगली येथे झाला.
आशा भोसले यांचे वडिल दीनानाथ मंगेशकर, जे मराठी आणि कोकणी संगीत मंचावरील अभिनेते आणि शास्त्रीय गायक होते. दीनानाथ यांचे नाव संगीत क्षेत्रात खूप नावाजलेले होते.
आशा ताईंना संगीत वारसा हा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला आहे.
आशा भोसले यांच्या आईचे नाव शेवंती उपाख्य उर्फ शुद्धमती मंगेशकर (माई मंगेशकर). त्यांच्या संगीत प्रेमाविषयी काही माहिती नाही..पण त्यांची भावंडे मात्र सर्वजण अगदी त्याही पुढच्या पिढीत ही दीनानाथांचाच हा गाण्याचा वारसा पुढे गेलेला दिसून येतो.
आशा भोसले यांच्या भावंडांमध्ये सर्वात मोठ्या लता मंगेशकर. त्यांच्या इतर भावंडांत मीना मंगेशकर/घाडीकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा समावेश आहे. ही सर्वजण संगीत क्षेत्रात आपापल्या जागी उच्च ठिकाणी आहेत….
आशाताईंनी श्री गणपतराव भोसले यांच्याशी विवाहबद्ध झाल्या..आणि त्यांच्या मृत्यू नंतर आर.डी. बर्मन यांच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांना हेमंत,वर्षा आणि आनंद ही तीन अपत्ये आहेत.
आशा भोसले या भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध गायिका, उद्योजिका आणि अभिनेत्री देखील आहेत.ज्यांनी मराठीसह इतर भारतीय भाषांमधील चित्रपटांमध्ये आणि अल्बमसाठी गाणी गायली आहेत.
‘मेलोडी क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले यांना त्यांच्या विविध प्रकारच्या गायन शैलीसाठी आणि आठ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीसाठी ओळखले जाते.
व्हायब्रेटो म्हणजे कंप गाणे म्हणण्यात त्या माहिर होत्या. जसे की….
” मोनिका ओ माय डार्लिंग…”
किंवा…
“रात अकेली है, बुझ गये दिये….”
किशोर कुमार बरोबर अशी गाणी फक्त आशा ताईच म्हणू शकत होत्या.
आशा भोसले यांनी विविध भारतीय भाषांमध्ये १० हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत आणि त्यांची गाणी भावपूर्ण गीतांपासून ते वर सांगितल्या प्रमाणे खट्याळ, मादक आणि उडत्या चालीच्या गीतांपर्यंत विविध प्रकारची आहेत.
आशा ताईंनी शास्त्रीय आणि पाश्चात्त्य शैलीतील गाणी सहजपणे गायली आहेत.
त्यांची प्रसिद्ध गाणी सांगायची झाली तर…..
“अजि मी ब्रह्म पाहिले ”
“अत्तराचा फाया तुम्ही मला…..”
किंवा
“जय शारदे वागीश्वरी …”
“स्वप्नातल्या कळ्यानों उमलू नकाच केंव्हा….”
ही अशी एका पेक्षा एक मराठी गाणी तर गायलीच पण त्याही पेक्षा हिंदी आणि इतर भारतीय विविध भाषेत गाणी गायली आहेत..
एवढेच नव्हे तर गाण्यातील विविध प्रकार म्हणजे लावणी, गझल ,शास्त्रीय गीते….सर्व प्रकार आशाताईंनी गायली आहेत…
“कंबर लचकली”,
“कुठं कुठं जायचं हनिमूनला” …..
यासारख्या लावण्या आशाताईंनी नजाकतीने म्हणाल्या आहेत…….व्वा! जे बात! असे ऐकताना तोंडातून वा वा…निघतेच आपल्या.
आशा भोसले यांनी गायलेल्या गझल मधील
“इन आँखों की मस्ती के” ….
ही अतिशय प्रसिद्ध गझल आहे.
“सलोना सा साजन है”, किंवा
” नैना तोसे लगे..”,
” दिल चीज क्या है..”….
या सारख्या गझल एकापेक्षा एक आपल्याला ऐकायला मिळतात…
आज युट्यूब, किंवा मोबाईल वर सहज उपलब्ध असल्याने, आपण कधी ही, कुठे ही, आणि हवे तेंव्हा याचा आनंद घेऊ शकतो.
आशा भोसले या ˈव्हऽसटाइल् सिंगर किंवा बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, असे म्हणूनच म्हणले जाते.
त्यांच्या गाण्यांची मोजदाद करणे ही कठीण होऊन बसेल इतकी विविध प्रकारची, विविध चालींची गाणी त्यांनी गायली आहेत.
आशा भोसले या लोकप्रिय मराठी गायिका आहेत.पण मराठीसह हिंदी, गुजराती आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे.
त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान आणि प्रभावशाली गायिका म्हणून ओळखले जाते.
त्यांना त्यांच्या अष्टपैलुत्व आणि सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ‘मेलोडी क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते.
सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला.
तरुण आहे रात्र अजुनी,
जिवलगा राहिले रे दूर,
ही वाट दूर जाते,
फुलले रे क्षण माझे,
झिनी झिनी वाजे,
गेले द्यायचे राहूनी,
गंध फुलांचा गेला सांगून,
आज कुणीतरी यावे,
एका तळ्यात होती -… अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे.
‘रेशमाच्या रेघांनी’तला लावणीचा ठसका,
‘सैनिक हो तुमच्यासाठी’तला कृतज्ञता भाव,
‘केव्हा तरी पहाटे’तली हुरहुर,
‘जे वेड मजला लागले’ची गोडी,
सगळेच विलक्षण!
त्यांनी ज्यांच्यासाठी गाणी गायली ते संगीतकार, ते गीतकार, त्या अभिनेत्री आणि आशा भोसलेंचा आवाज – या सर्वांच्या परस्परसंबंधांचे संख्यात्मक व गुणात्मकदृष्ट्या वर्णन करणे हे एक अशक्यप्राय काम आहे. त्याचबरोबर आशाताईंनी गायलेली चित्रपटगीते (मराठी, हिंदी व अन्य भाषांतील), भावगीते, गझल, भजने-भक्तिगीते इत्यादी गाण्यांची व संबंधित चित्रपटांची केवळ यादी करायची ठरवली, तरी ते एक आव्हानात्मक काम आहे.
आशा भोसले यांनी अभिनय क्षेत्रात ही पाऊल टाकले. गायनासोबतच त्यांनी २०१३ मध्ये ‘माई’ या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. मी पाहिला तो चित्रपट…उत्कृष्ठ अभिनय केलाय.
आशा भोसले या मंचावरून एक ‘उत्कृष्ट परफॉर्मर’ म्हणून रसिकांसमोर येतातच, पण त्या स्वयंपाकाची आवड असलेल्या, मुलांना सांभाळणाऱ्या एक परिपूर्ण गृहिणी देखील आहेत; एवढेच नव्हे,तर क्रिकेटच्या दर्दी रसिक असलेल्या भारतीय नागरिक आहेत.
एवढे यश, मानसन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवरच असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री-कलाकार आहेत. इतर मंगेशकर भावंडांप्रमाणेच त्यांना वडिलांचा (दीनानाथांचा) अभिमान आहे.
आशाताईंना अनेक राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच इ.स. २००८ मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांची घोडदौड 92 व्या वर्षात असून ही ,अजून ही चालू आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये देण्यात आला.
ग्रॅमी पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार ही त्यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
आशाताई एक भारतीय पार्श्वगायिका आणि उद्योजिका आहेत. त्या त्यांच्या बहुमुखी प्रतिभेसाठी ओळखल्या जातात. त्यांची कारकीर्द सुमारे १९४३ मध्ये सुरू झाली आणि आठ दशकांहून अधिक काळ ती विस्तारली. त्यांनी एक हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे. तसेच, त्यांनी विविध खाजगी अल्बम रेकॉर्ड केले आहेत आणि भारत आणि परदेशात अनेक एकल संगीत मैफिलींमध्ये भाग घेतला आहे.
अशा या चतुरस्त्र गायिका ,
*पद्मविभूषण आशा भोसले*
यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते.
यांना आजच्या या नवरात्रविशेष लेखमालेत नवदुर्गेचा सन्मान देऊन गौरव करत आहे…त्यांना माझा हा मानाचा मुजरा….
🙏🙏🙏🙏🙏🙏
…………………………………………………………..
© पल्लवी उमेश
जयसिंगपूर
27/9/2025
टीप..हा लेख माझ्या नावासह वापरल्यास हरकत नाही.🙏
