पिंपरी/चिंचवड :
कर्मयोगिनी महिला संस्था, पिंपरी आयोजित “कविता नात्यागोत्यांच्या” या विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. संजीवनी बोकील यांच्या कवितांची सुश्राव्य मैफिल चिंचवड येथील मीना पोखरणा यांच्या खुशबू बंगल्यात शनिवारी (दि. २७ सप्टेंबर २०२५) रंगतदारपणे पार पडली.
आयुष्यातील मूर्त व अमूर्त नात्यांचा काव्यमय गोफ प्रा. बोकील यांनी आपल्या सुरेल व प्रभावी कवितांद्वारे विणला. यावेळी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे निवेदन मा. स्मिता लाटे यांनी केले तर अभिनेत्री व गायिका सानिका जोशी यांनी सुमधुर गायन सादर करून सोहळ्याला अधिक रंगत आणली.
दुसऱ्या सत्रात बहारदार कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. प्रा. सुरेखा कटारिया यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून मीना पोखरणा उपस्थित होत्या. कवी मा. राजेंद्र घावटे, वंदना इन्नानी, माधुरी डिसोजा, बाबू डिसोजा, जास्मिन पोखरणा, तेजश्री देशपांडे, अनिल आठलेकर, प्रदीप तळेकर, निलेश शेंबेकर, प्रशांत पोरे व संजना मगर यांनी आपल्या प्रभावी काव्यरचना सादर करून रसिकांना आनंदित केले.
सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. हेमंत जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. सलोनी गांधी यांनी केले. या कार्यक्रमाला तांत्रिक सहकार्य नील गांधी यांनी केले. तसेच शांतीलाल गांधी व अभय पोखरणा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
