You are currently viewing वैकुंठ रथच नव्हे, ॲम्बुलन्सही लवकरच आणणार; समाजसेवा ही बनावट दारू विकण्याइतकी सोपी नाही

वैकुंठ रथच नव्हे, ॲम्बुलन्सही लवकरच आणणार; समाजसेवा ही बनावट दारू विकण्याइतकी सोपी नाही

रवी जाधव यांच्या समर्थनार्थ युवा सेनेला प्रत्युत्तर; लक्ष्मण कदम

 

सावंतवाडी :

“वैकुंठ रथ काय, तर ॲम्बुलन्सही आम्ही लवकरच आणणार आहोत. मात्र समाजकारण करणे म्हणजे बेकायदा गोवा बनावट दारू विकणे इतके सोपे काम नाही,” असा थेट टोला सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी लक्ष्मण कदम यांनी युवा सेनेला लगावला आहे.

युवा सेनेचे तालुकाध्यक्ष निखिल सावंत यांनी सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी रवी जाधव यांच्यावर टीका केली होती. यावर प्रत्यूत्तर देताना कदम यांनी प्रसिद्धीपत्रक काढून जाधव यांच्या कामाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा सविस्तर परामर्श दिला.

कदम म्हणाले की, रवी जाधव हे हाडाचे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी बी.ए., बी.एड., एम.ए., एम.फिल पर्यंतचे उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांनी कठीण परिस्थितीतून उभं राहत समाजासाठी काम केले आहे. संकटात सापडलेल्या लोकांना ते रात्रंदिवस मदत करत असतात. त्यांच्या कामाबाबत आधी अभ्यास करा आणि मगच त्यांच्यावर टीका करा.

रवी जाधव यांनी फक्त मानवी जीवनाशी निगडित असलेल्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. पण त्यावर चर्चा करण्याऐवजी काहीजण फक्त भंकस बडबड करत आहेत. आपण समाजासाठी नेमकं काय केलंय ते दाखवा आणि मग बोला. अजून तुम्ही खूप लहान आहात, उगाच ढवळाढवळ करू नका.

“कोविडच्या काळात काही नेत्यांनी रवी जाधव यांचा व्यवसाय उध्वस्त केला, त्यावेळी त्यांना व त्यांच्या कुटुंबाला रस्त्यावर आणले. मात्र सावंतवाडीकर जनतेच्या आशीर्वादाने जाधव पुन्हा उभे राहिले आणि आजही प्रामाणिकपणे रस्त्यावर बसून मिळवलेल्या पैशातून सामाजिक काम करत आहेत. आम्ही त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करतो,” असे कदम म्हणाले.

कदम यांनी स्पष्ट केले की, “सहा दिवसांच्या मिनी महोत्सवाचा काही खर्च मा. दीपकभाई केसरकर यांनी केला होता, मात्र उरलेला सर्व खर्च आम्हीच पदरी मोडून केला. कार्यक्रम शहरात थाटामाटात पार पडला आणि त्यावेळी केसरकर यांनी आमचे कौतुकही केले होते. त्यामुळे आज काही जण याचा विपर्यास करून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, ही बाब चुकीची आहे.”

पुढे ते म्हणाले, “वैकुंठ रथच काय, तर ॲम्बुलन्सही आम्ही आणणार आहोत आणि ती गरीब रुग्णांसाठी २४ तास मोफत उपलब्ध राहील. आमची समाजसेवा स्वकष्टाने व स्वहिमतीने चालते आणि पुढेही चालणार आहे. कुणाच्याही नेत्याची बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही. मात्र शहरात चुकीच्या गोष्टी घडल्या तर आवाज उठवणारच. रवी जाधव यांचे सामाजिक कार्य पारदर्शक असून त्याला दररोज जनतेची पोचपावती मिळत आहे. आम्ही पुढेही आमच्या न्यायहक्कांसाठी लढत राहणार कारण शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आम्हाला लाभलेला आहे,” असे कदम यांनी ठामपणे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा